कॅलिफोर्निया : जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी ॲपल व ओपनएआय यांच्यातील भागीदारीस विरोध केला असून, आपल्या कंपनीत ॲपलची उत्पादने वापरण्यावर बंदी घालू, असा इशारा दिला आहे. आपली उत्पादने अधिक उत्तम करण्यासाठी ॲपलने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ओपनएआयशी भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
समाजमाध्यम मंच ‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये मस्क यांनी म्हटले की, ऑपरेटिंग सिस्टम पातळीवर ओपनएआयला सहभागी करून घेण्याचा निर्णय ॲपल घेत असेल, तर माझ्या कंपनीत ॲपलच्या सर्व उपकरणांवर बंदी घातली जाईल. हे एक अस्वीकारार्ह सुरक्षा उल्लंघन आहे. माझ्या कंपनीत आलेल्या अतिथीकडेही ॲपलचे उपकरण असेल, तर तपासणी करून ते गेटवरच जमा करून घेतले जाईल.
अन्य एका पोस्टमध्ये मस्क यांनी म्हटले की, ॲपल आपले स्वत:चे एआय विकसित करू शकत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे. ओपनएआयला आपला डेटा सोपवून ॲपल तुमचा (ॲपलच्या वापरकर्त्यांचा) डेटा धोक्यात टाकत आहे. (वृत्तसंस्था)
ॲपलचे युजर्स किती?
आयफोन १७४ कोटी
आयपॅड ४.६४ कोटी
(२०२३ मधील आकडेवारी)
ॲपलकडे आहे विशेष सुरक्षाव्यवस्था
सध्या ॲपलच्या उपकरणात गोपनीयतेसाठी खास सुरक्षा व्यवस्था आहे. ही इतकी अभेद्य आहे की, उपकरणे मालक आणि कंपनी यांच्याखेरीज कोणीही उघडू शकत नाही. २०१६ मध्ये एक अतिरेकी सैयद फारुख याचा आयफोन एफबीआयला उघडता आला नव्हता.