नवी दिल्ली :भारताकडून दिल्या जाणाऱ्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेअंतर्गत आघाडीची अमेरिकन स्मार्टफोन निर्माता अॅपल (Apple) कंपनी आयपॅडचे उत्पादन आता भारतात तयार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताच्या घडीला अॅपलच्या आयपॉडचे उत्पादन चीनमध्ये केले जाते. मात्र, चीनमधील प्रकल्प हलवून तो भारतात आणण्याची तयारी अॅपलकडून केली जात असल्याचे सांगितले जात आहे. (apple plans to manufacture ipad in india)
अॅपल कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन्स निर्यातीला अधिक चालना मिळावी, यासाठी भारत सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेअंतर्गत सुमारे ५० हजार कोटींपर्यंत निधी देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. अॅपल कंपनी या योजनेचा लाभ घेऊ इच्छिते. चीनवरील अवलंबित्व कमी करून फॉक्सकॉनच्या माध्यमातून आयपॅडचे उत्पादन भारतात करण्याची तयारी कंपनीकडून सुरू आहे, असे यावेळी सूत्रांकडून सांगण्यात आले.
रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ७७ हजारांपर्यंत मिळणार पगार; अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती
अॅपलकडून २० हजार कोटींची गुंतवणूक
भारतात आयपॅडचे उत्पादन करण्यासाठी सुरुवातीला अॅपलकडून २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध आणि कोरोना संकटामुळे अॅपल कंपनीने आपल्या धोरणांमध्ये बदल केला आहे. सध्या अॅपलच्या बहुतांश आयपॅडचे उत्पादन चीनमधून केले जाते. तर लॅपटॉप व्हिएतनाममध्ये तयार केले जातात. मात्र, आयपॅडचे उत्पादन भारतात करण्यासाठी अॅपलकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, अॅपल कंपनीकडून २०१७ पासून आयफोनची असेम्ब्ली भारतात केली जात आहे.
स्मार्टवॉच उत्पादनासाठी प्रोत्साहन
भारत सरकारच्या पीएलआय योजनेअंतर्गत देशात स्मार्टवॉच उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन म्हणून ५ हजार कोटी रुपयांचा निधी जारी केला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे. आयपॅडचे उत्पादन करायचे असेल, तर बिगर चिनी कंपनीसोबत भारतात प्रकल्पाची सुरुवात करावी लागेल, असे सरकारकडून अॅपल कंपनीला सांगण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे.