Join us

Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 12:17 PM

iPhone sales in India: आयफोनच्या बंपर विक्रीनंतर उत्साहित झालेले अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी भारतात ४ नवीन अ‍ॅपल स्टोअर्स उघडण्याची घोषणा केली आहे.

iPhone sales in India: आयफोन उत्पादक कंपनी अ‍ॅपलनं (Apple) भारतात आतापर्यंत विक्रमी कमाई केली आहे. जुलै-सप्टेंबर २०२४ मध्ये देशातील आयपॅडच्या (iPad) विक्रीत दुहेरी आकड्यांतील वाढ नोंदवण्यात आली. समीक्षाधीन तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री सहा टक्क्यांनी वाढून ९४.९३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षी ८९.४९ अब्ज डॉलर होती. आयफोनच्या बंपर विक्रीनंतर उत्साहित झालेले अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी भारतात ४ नवीन अ‍ॅपल स्टोअर्स उघडण्याची घोषणा केली आहे.

अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक यांनी यासंदर्भात माहिती दिली. आम्ही अमेरिका, युरोप आणि उर्वरित आशिया पॅसिफिक तसेच अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, फ्रान्स, यूके, कोरिया, मलेशिया, थायलंड, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसह अनेक देशांमध्ये विक्रमी तिमाही महसूल मिळवला आहे. आम्ही भारतात दिसत असलेल्या उत्साहानं आनंदी आहोत, जिथे आम्ही आजवरचा सर्वाधिक विक्रमी महसूल मिळवला आहे," असं टिम कुक म्हणाले.

४ नवीन स्टोअर्स उघडण्याची घोषणा

अ‍ॅपलनं या तिमाहीत देशात दोन नवीन स्टोअर्स देखील उघडले आहेत. एक स्टोअर मुंबईत तर दुसरं दिल्लीत उघडण्यात आलंय. "आम्ही भारतातील ग्राहकांसाठी चार नवीन स्टोअर्स उघडण्यास उत्सुक आहोत," असं कुक म्हणाल्याचं पीटीआयनं म्हटलंय. अॅपलनं ऑक्टोबरच्या सुरुवातीला पुणे, बंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि मुंबईत आणखी चार स्टोअर्स उघडण्याची घोषणा केली आहे.

सॅमसंगला मिळतेय कडवी स्पर्धा

काउंटरपॉइंट रिसर्चच्या रिपोर्टनुसार, सप्टेंबर २०२४ तिमाहीत अॅपल आयफोनचा भारतातील विक्रीत २१.६ टक्के वाटा होता, जो सॅमसंगपेक्षा किंचित कमी आहे. जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीत अॅपलचा उत्पादनांच्या विक्रीतून मिळणारा महसूल ४.१२ टक्क्यांनी वाढून ६९.९५ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. आयफोनची विक्री ५.५ टक्क्यांनी वाढून ४६.२२ अब्ज डॉलरवर पोहोचली, जी वार्षिक आधारावर ४३.८ अब्ज डॉलर होती.

टॅग्स :अॅपलव्यवसाय