Join us

Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 2:04 PM

Apple Results : निकाल जाहीर करण्यासोबतच कंपनीने ११० अब्ज डॉलर्सच्या शेअर बायबॅक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. अॅपलच्या इतिहासातील हे सर्वात मोठं शेअर बायबॅक आहे.

Apple Results : अमेरिकेची आयफोन (iPhone) निर्माता कंपनी अॅपलनं (Apple) तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल मागील वर्षीच्या तुलनेत चार टक्क्यांनी घसरून ९०.८ अब्ज डॉलरवर आला आहे. विशेषत: चीनमध्ये कंपनीला कडव्या स्पर्धेला सामोरं जावं लागत आहे. या काळात आयफोनच्या विक्रीत १० टक्क्यांनी घट झाली आहे. 

निकाल जाहीर करण्यासोबतच कंपनीने ११० अब्ज डॉलर्सच्या शेअर बायबॅक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. अॅपलच्या इतिहासातील हे सर्वात मोठं शेअर बायबॅक आहे. या घोषणेमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास सात टक्क्यांची वाढ झाली असून मार्केट कॅपमध्ये १८० अब्ज डॉलरची वाढ झाली. ही रक्कम भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सनुसार अंबानी यांची संपत्ती ११३ अब्ज डॉलर्स आहे. 

शेअर्सच्या वाढीसह अॅपलचं मार्केट कॅप २.६७१ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलंय. मायक्रोसॉफ्ट (२.९५६ ट्रिलियन डॉलर) नंतर अॅपल जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी आहे. मार्च तिमाहीत आयफोनची विक्री ४५.९६ अब्ज डॉलर्स होती, जी अंदाजापेक्षा कमी आहे. या काळात कंपनीचं निव्वळ उत्पन्नही वर्षभरापूर्वीच्या तुलनेत २३.६ अब्ज डॉलर्सवर आलं आहे. मार्च तिमाहीत मॅकची विक्री ४ टक्क्यांनी वाढून ७.५ अब्ज डॉलर्स झाली आहे, तर सर्व्हिसेसचं उत्पन्न २३.९ अब्ज डॉलर्स झाल्याचं कंपनीनं म्हटलंय. अॅपलचा आयपॅडचा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी घसरून ५.६ अब्ज डॉलर्सवर आलाय. 

चीनमध्ये समस्या, भारताकडून गूड न्यूज 

वाढता राष्ट्रवाद, अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानं आणि चीनमधील वाढती स्पर्धा यामुळे कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. चिनी कंपन्या हुवावे आणि शाओमी अॅपलची बाजारपेठ काबीज करत आहेत. मार्केट रिसर्च फर्म आयडीसीच्या म्हणण्यानुसार, पहिल्या तिमाहीत अॅपलच्या शिपमेंटमध्ये १० टक्के घट झाली आहे. "कंपनीनं अनेक ठिकाणी विक्रमी महसूल कमावला आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारतात अॅपलची बाजारपेठ झपाट्यानं वाढत आहेस" अशी प्रतिक्रिया कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी दिली. भारतात या कंपनीची दोन स्टोअर्स आहेत. त्यापैकी एक नवी दिल्लीत तर दुसरा मुंबईत आहे.

टॅग्स :अॅपलव्यवसायभारतचीन