टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांच्या नोकरीच्या शोधाच्या दिवसांतील रिझ्यूमे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी हे रेझ्यूमे पाठवले होते. ब्लूमबर्गचे ज्येष्ठ पत्रकार जॉन एर्लिचमन (Jon Erlichman) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर त्यांचे रिझ्यूमे शेअर केले आहेत.
या रेझ्युमेचा फोटो शेअर करत त्यांनी स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांचा वयाच्या १८ व्या वर्षीचे रिझ्यूमे असा कॅप्शन दिलंय. एर्लिचमन यांची ही पोस्ट आतापर्यंत दहा लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. त्यांच्या या पोस्टला हजारो लाईक्सही मिळाले आहेत. तसंच शेकडो युजर्सनी ती पोस्ट रिपोस्ट केलीये आहे.
Steve Jobs and Bill Gates’ resumes at age 18: pic.twitter.com/tFTltp80jM
— Jon Erlichman (@JonErlichman) August 27, 2024
काय लिहिलंय त्यांच्या रिझ्युमे मध्ये?
स्टीव्ह जॉब्स यांच्या रिझ्युमेमध्ये प्रामुख्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेकचा उल्लेख करण्यात आलाय. डिझाईन इंजिनिअरिंग आणि डिजिटलमध्ये त्यांना अधिक आवड असल्याचंही त्यात नमूद केलंय. अमेरिकन उद्योजक आणि Apple Inc. चे को फाऊंडर स्टीव्ह जॉब्स यांनी पर्सनल कम्प्युटर उद्योगात क्रांती घडवली होती. २०११ मध्ये वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
कुठे केलेला अर्ज?
बिल गेट्स यांनी १९७४ मध्ये हार्वर्डमध्ये पहिल्या वर्षी हा रिझ्यूमे लिहिला होता. त्यात ते 'सिस्टीम अॅनालिस्ट किंवा सिस्टिम प्रोग्रामर'साठी अर्ज करताना दिसतात. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पर्सनल कॉम्प्युटिंग आणि सॉफ्टवेअरच्या जगात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. याशिवाय बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठीही ते ओळखले जातात.
जगातील ७ वे श्रीमंत व्यक्ती
फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स सातव्या क्रमांकावर आहेत. बिल गेट्स यांची एकूण संपत्ती १३८ अब्ज डॉलर्स आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क आहेत. सुमारे २४८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.