Join us

सफरचंदाचा नवा ‘अवतार’

By admin | Published: April 20, 2015 12:15 AM

वातावरण बदलामुळे तापमान वाढत असून हिमवृष्टीचे प्रमाण कमी झाल्यामुळे सध्या आपण खात असलेल्या सफरचंदाची चव बदलू शकते.

मनाली : वातावरण बदलामुळे तापमान वाढत असून हिमवृष्टीचे प्रमाण कमी झाल्यामुळे सध्या आपण खात असलेल्या सफरचंदाची चव बदलू शकते. हवामानाचा सफरचंदाच्या स्वादावर होऊ घातलेला परिणाम पाहता उत्पादकांनी आता नव्या वाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. हवामान बदलानुसार सफरचंदाचे उत्पादन घेतले जावे, हा त्यामागचा उद्देश आहे.हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या कमी उंचीवरील भागात कमी थंडीत लवकर पिकणाऱ्या सफरचंदांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले जात आहे. दुसरीकडे पारंपरिक सफरचंदांचे उत्पादन आता अधिक उंचीवरील भागाकडे स्थानांतरित होऊ लागले आहे. कमी म्हणजे ४ हजार फूट उंचीपर्यंतच्या क्षेत्रात पारंपरिक सफरचंदाचे पीक घेणे अवघड बनले आहे. वातावरण बदलाचा फटका या पिकाला बसू लागल्याने आम्ही गेल्या दोन वर्षांत नव्या वाणांवर लक्ष केंद्रित केले आहे, असे सफरचंद उत्पादक संघाचे अध्यक्ष राकेशसिंग यांनी सांगितले. त्यांच्या सिमलाजवळील कोटगड येथे सफरचंदाच्या बागा आहेत. नव्या वाणांचा स्वाद वेगळा असला तरी भारतीय ग्राहकांसाठी तो चांगला आहे, असे ते म्हणाले. कमी थंडीत मायकेल, ट्रॉपिकल ब्युटी, स्कूलमेट आदी सफरचंदाचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी लाभकारक ठरेल, असे कृषी वैज्ञानिकही मानतात. (वृत्तसंस्था)