Join us

अॅपल करतंय भारतीयांची लूट, अन्य देशांच्या तुलनेत आयफोन १५ हजारांनी महाग

By admin | Published: October 17, 2015 2:09 PM

हुतेक कंपन्या १० ते १५ हजार रुपयांच्या रेंजमध्ये स्मार्ट फोन देत असताना अॅपल मात्र आयफोनच्या माध्यमातून प्रति फोन सुमारे १५ हजारांची लूट करत असल्याचं

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - भारतातलं स्मार्टफोनचा बाजार प्रचंड वेगानं वाढत असताना आणि बहुतेक कंपन्या १० ते १५ हजार रुपयांच्या रेंजमध्ये स्मार्ट फोन देत असताना अॅपल मात्र आयफोनच्या माध्यमातून प्रति फोन सुमारे १५ हजारांची लूट करत असल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या टेकटीमनं दाखवून दिलं आहे. भारतीय ग्राहकांकडून जास्ती जास्त पैसे मिळवण्याचं आयफोनचं धोरण आहे की काय असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. 
अॅपलनं नुकतेच आयफोन ६ एस आणि आयफोन ६ एस प्लस भारतीय बाजारात दाखल केले. मध्यमर्गीयांना न परवडणा-या किमती या दोन्ही फोनच्या ठेवण्यात आल्या असून या दोन्ही फोनची अन्य देशातील विक्रीची किमत भारतातल्यापेक्षा खूप कमी असल्याचंही टाइम्सनं म्हटलं आहे. 
आयफोन ६ एस प्लस हा १२० जीबी क्षमतेचा फोन भारतात ९२ हजार रुपयांना उपलब्ध आहे. या फोनची तुलना अन्य फोनशी होऊ शकत नाही, परंतु १६ जीबी फोनची तुलना सॅमसंग गॅलक्सी, गुगल नेक्सस वा अन्य फोनशी केली तरी आयफोन १५ ते २० हजार रुपयांनी महाग असल्याचे दिसून येते.
तसेच आयफोनच्या भारतातल्या किमतीची तुलना अन्य देशांतल्या किमतीशी केली तरीही फरक जाणवण्यासारखा आहे.
आयफोन ६ एसची १६ जीबीची भारतातली किंमत ६२ हजार रुपये आहे. हाच फोन अमेरिकेत ४२ हजार, सिंगापूरमध्ये ४९ हजार, अमिरातीत ४६ हजार, इग्लंडमध्ये ५४ हजार, चीनमध्ये ५४ हजार, हाँगकाँगमध्ये ४७ हजार व कॅनडामध्ये ४५ हजार रुपयांना उपलब्ध आहे. याचा अर्थ भारतीयांना आयफोनसाठी जवळपास १५ हजार रुपये जास्त मोजावे लागतात.
याचा परिणाम आयफोनची खरेदी अधिकृत बाजारातून न करता ग्रे मार्केटमधून करण्यामध्ये होऊ शकतो.