अर्जुन : (काल्पनिक पात्र) : कृष्णा, दिवाळीचे दिवस आहेत. अशावेळी गिफ्ट मिळाल्यास आनंद होतो; पण अशा भेटींवर कर भरावा लागतो का?कृष्ण : (काल्पनिक पात्र) : भेटवस्तूचे मूल्य रु. ५०,०००/-पेक्षा जास्त असेल, तर भेटवस्तूवर करसवलत नाही.
अर्जुन : भेटीसंबंधी आयकर कायद्याच्या काय तरतुदी आहेत?कृष्ण : भेटवस्तूंचे तीन प्रकार आहेत. १) रोख किंवा चेक २) जमीन किंवा इमारत ३) सोने व चांदीचे दागिने, शेअर्स आदी मौल्यवान वस्तू.
अर्जुन : कोणती भेट करमाफ आहे? कृष्ण : अर्जुन, खालील मिळालेल्या भेटी करपात्र नाहीत : १. जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या सर्व प्रकारच्या व कोणत्याही किमतीच्या भेटी.२. वर्षभरात एकूण रु. ५०,०००/- च्या आत किमतीची भेट जवळच्यानातेवाईक नसलेल्या व्यक्तीकडून मिळाल्यास आयकर माफ आहे.३. लग्नामध्ये मिळालेल्या (कुणाहीकडून कितीही रकमेच्या) भेटी करपात्र नाहीत. ४. मृत्यूपत्र किंवा वारसाहक्काने मिळालेल्या भेटींवर कर माफ आहे. ५. कलम १२ए/१२एए/१०(२३) अंतर्गत अधिसूचित ट्रस्ट किंवा संस्थाकडून मिळालेल्या भेटवस्तूंना सूट आहे.६. कर्मचाऱ्याला एका वर्षात मिळालेली भेट रु. ५००० पेक्षा कमी असेल, तर करमुक्त आहे.
अर्जुन : अरे व्वा! लग्नामध्ये मिळालेल्या भेटीवर टॅक्स लागत नाही व त्याला कोणतीही मर्यादा नाही. टॅक्स प्लॅनिंग करण्यासाठी पर्याय चांगला आहे? कृष्ण : परंतु टॅक्स प्लॅनिंग म्हणून अशा तरतुदींचा जास्त वापर करू नका. गिफ्ट देणा-याला तेकोठून दिले हे दाखवावे लागेल. तसेच त्याची यादीही ठेवावी लागेल. लग्नाचाही खर्च नीट हिशेबात घ्यावा अन्यथा गिफ्टच्या नादात लग्नामध्ये अवाढव्य खर्च कोठून केला, हे सिध्द करण्यास त्रास होईल. आणखी एक. जवळचे नातेवाईक सोडून वा तिऱ्हाईत व्यक्तींकडून चल-अचल संपत्ती बाजार मूल्यपेक्षा कमी किमतीत खरेदी केल्यास रु. ५०,०००/- पेक्षा वरच्या फरकावर ते गिफ्ट मिळाले आहे, असे समजून खरेदी करणाऱ्याला आयकर लागू होईल.
अर्जुन : जीएसटीअंतर्गत दिवाळी भेटवस्तू खरेदीवर इनपुट टॅक्स क्रेडिटमिळेल का? कृष्ण : कायद्याच्या कलम १७ (५)(४) नुसार भेटवस्तू किंवा विनामूल्य नमुने म्हणून दिलेल्या वस्तूंच्याबाबतीत इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही.पण एक सांगतो, भेटीचा आदर करावा आणि संपत्ती मेहनतीने कमवावी!
- उमेश शर्मा,चार्टर्ड अकाऊंटंट