Join us  

‘नो कॉस्ट ईएमआय’ घेणार आहात का ? डोळे झाकून खरेदी करणे नुकसानदायी ठरू शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 9:57 AM

निवडलेल्या वस्तूवर किती किंमत आकारली जात आहे, इतर विक्रेते हीच वस्तू किती किमतीला देत आहेत, खरेदी केल्याने नेमका किती रकमेचा लाभ होणार आहे, याची सर्वप्रथम खातरजमा करून घ्यावी.

नवी दिल्ली : सणासुदीला घरी नवी वस्तू आणण्याचा बेत आखला जात असतो. त्यामुळे याच काळात विक्रेते अनेक आकर्षक सवलतीच्या ऑफर्स देत असतात. यात ग्राहकांची सर्वांत आवडती लोकप्रिय ऑफर असते ती म्हणजे ‘नो कॉस्ट ईएमआय प्लान’. कारण यामुळे महागडी वस्तू थोड्या पैशात घरी येणार असते आणि ऑफरमुळे या खरेदीवर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नसते. परंतु केवळ यामुळे डोळे झाकून खरेदी करणे नुकसानदायी ठरू शकते. ही ऑफर घेण्याआधी नियम व अटी नीटपणे वाचायला हव्यात.

किमतीची तुलना करा

निवडलेल्या वस्तूवर किती किंमत आकारली जात आहे, इतर विक्रेते हीच वस्तू किती किमतीला देत आहेत, खरेदी केल्याने नेमका किती रकमेचा लाभ होणार आहे, याची सर्वप्रथम खातरजमा करून घ्यावी.

बँकेच्या अटी काय? 

विक्रेता तुम्हाला ऑफर देत असताना आर्थिक पुरवठा करणाऱ्या संबंधित बँकांचे पर्याय देत असतो. त्या बँकांच्या अटी काय आहेत, बँकांकडून काही शुल्क आकारले जाणार आहे का, याची खातरजमा करावी.

प्रोसेसिंग चार्जेस किती?

ऑफरमध्ये प्रोसेसिंग चार्जेसची माहिती दिलेली नसते. हे शुल्क ईएमआय व्यतिरिक्त घेतली जात असते. त्यामुळे हे शुल्क नेमके किती आहे, अन्य छुपे चार्जेस आहेत का याची माहिती आधीच घ्यावी. अन्य नियम आणि अटी समजून घ्यावात. ग्यारंटीच्या नावेही अनेकदा वेगळे शुल्क आकारले जात असते.

रिफंडची सोय आहे का?

मुदतीआधी सर्व पेमेंटची सोय दिली जाईल का, अशा स्थितीत वेगळे शुल्क आकारले जाते का, याची माहिती घ्यावी. काही कारणास्तव खरेदीचा निर्णय रद्द केल्यास वस्तू परत करता येईल का, रिफंड पूर्ण मिळणार की त्यातील काही पैसे कापून घेतले जाणार याचीही माहिती घ्यावी.

बजेटचे नियोजन करा स्वस्तात वस्तू खरेदी करता

येणार आहे, प्लान मिळतोय म्हणून खरेदी करून नका. ईएमआय लागू असलेल्या काळात इतर खर्चांना पैसे कमी पडू शकतात किंवा त्या खर्चावर ताण येऊ शकतो. यामुळे तुमचे महिन्याचे बजेट कोलमडू नये, याची काळजी घ्या.