नवी दिल्ली : आगामी ६ महिन्यांत कर्मचाऱ्यांची स्थायी भरती करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांची संख्या अर्ध्याने घटून सप्टेंबरच्या तिमाहीत १५.९ टक्क्यांवर आली आहे. जूनच्या तिमाहीत ३०.९ टक्के कंपन्या भरतीसाठी इच्छुक होत्या. अस्थायी कर्मचाऱ्यांची भरती करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांची संख्याही या काळात ४५ टक्क्यांवरून घटून ३५.६ टक्क्यांवर आली आहे.
नॅशनल काैन्सिल ऑफ अप्लायड इकॉनॉमिक रिसर्चने (एनसीएईआर) वित्त वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी ताजे ‘बिझनेस एक्सपेक्टेशन्स सर्वेक्षण (बीईएस) नुकतेच जारी केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. मागील ३ महिन्यांतील भरतीच्या पद्धती आणि आगामी ६ महिन्यांचा संभाव्य कल, याची माहिती यात असते.
५० कंपन्यांचा सर्वेक्षणात सहभाग
सर्वेक्षणाच्या १२६ व्या फेरीत ५० कंपन्यांना सहभागी करून घेतले होते. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सहयोगाने सप्टेंबरमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. १९९१ पासून हे तिमाही सर्वेक्षण करण्यात येते.
अहवालात म्हटले आहे की, श्रम बाजारांवर दबाव कायम राहील. आगामी ६ महिन्यांत भरतीबाबत स्थिरता राहील. कारण ८३.३ टक्के संस्थांना वाटते की, कर्मचारी संख्येत बदल होणार नाही.