Join us

आपण टेन्शनमध्ये आहात? 'Yes' म्हटल्यानं गेली 100 हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी...! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 20:11 IST

खरे तर, कंपनीने आपल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांचे एक सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण कार्यरत कर्मचाऱ्यांच्या तणावासंदर्भात करण्यात आले होते...

येस मॅडम ही डोरस्टेप ब्यूटी सर्व्हिस देणारी कंपनी सध्या वादात सापडली आहे. नोएडात असलेल्या या स्टार्टअप कंपनीने अचानकपणे आपल्या 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. जे कर्मचारी कार्यालयात तणावाखाली अथवा टेन्शनमध्ये होते त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. 

खरे तर, कंपनीने आपल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांचे एक सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण कार्यरत कर्मचाऱ्यांच्या तणावासंदर्भात करण्यात आले आणि जे कर्मचारी तणावग्रस्त आढळले अथवा ज्यांनी तणाव जाणवत असल्यासंदर्भात 'हो' असे उत्तर दिले, त्यांना नंतर नारळ देण्यात आले. लिंक्डइन पोस्टनुसार, यासंदर्भात कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे माहिती दिली आहे.

कंपनीच्या इमेलमध्ये काय? -कंपनीने आपल्या ईमेलमध्ये लिहिले आहे, 'प्रिय टीम, कामाच्या तणावासंदर्भात आपल्या भावना समजून घेण्यासाठी आम्ही नुकतेच एक सर्वेक्षण केले. यात आपल्यापैकी अनेकांनी समस्या शेअर केल्या, ज्याला आम्ही मनापासून महत्व देतो आणि त्यांचा आदर करतो. एक हेल्दी आणि सपोर्टिव्ह वर्क एनव्हायर्नमेंट निर्माण करण्यासाठी वचनबद्ध कंपनी म्हणून, आम्ही आपल्या फिडबॅकवर प्रचंड विचार केला. तसेच, कामावर कुणीही ताणावखाली राहणार नाही यासाठी आम्ही त्या कर्मचाऱ्यांना कंपनीपासून वेगळे करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे." महत्वाचे म्हणजे, ईमेलमध्ये पुढे लिहिले आहे की, "हा निर्णय तत्काळ लागू होत आहे आणि प्रभावित कर्मचाऱ्यांना अधिक माहिती स्वतंत्रपणे दिली जाईल. आपल्या योगदानासाठी धन्यवाद..."

100 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं -लिंक्डइनवर ही पोस्ट यस मॅडममधील यूएक्स कॉपीरायटर अनुष्का दत्ताने शेअर केली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "यस मॅडममध्ये काय सुरू आहे? आपण आधी एक रँडम सर्वेक्षण करता आणि नंतर आम्हाला अचानकपणे काढून टाकता. केवळ आम्ही टेन्शनमध्ये आहोत म्हणून? आणि केवळ मलाच नाही, तर 100 इतर लोकांनाही नोकरीवरून काढण्यात आले आहे."

महत्वाचे म्हणजे, या पोस्टवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही लोकांनी कंपनीचा हा निर्णय अणानवीय असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी, हा कंपनीचा पीआर स्टंट असल्याचे म्हटले आहे. मात्र, ही छाटणी खरी आहे की, केवळ एक पीआर स्टंट? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :नोकरीकर्मचारी