चंद्रकांत दडस, उपसंपादक
सध्या आपल्या प्रत्येकासाठी मोबाइल हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मोबाइलशिवाय एक दिवस जगणेही कठीण झाले आहे. मोबाइलचा वापर आता फक्त बोलण्यासाठीच नव्हेतर, इतर अनेक कामांसाठी केला जात आहे. एआय, मशीन लर्निंग क्षमता यासारखी प्रगत वैशिष्ट्ये मोबाइलमध्ये येत आहेत. याशिवाय मोबाइलच्या किमतीही वाढत आहेत. त्यामुळे मोबाइलला सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळे मोबाइलच्या सुरक्षेसाठी तुम्ही तुमच्या मोबाइल फोनचा विमा काढू शकता.
हा विमा का गरजेचा?
मोबाइल विमा चोरीव्यतिरिक्त, सॉफ्टवेअर संबंधित नुकसान आणि इतर हार्डवेअर संबंधित समस्या कव्हर होतात. फोन पडल्यामुळे होणारे नुकसान, फोनमध्ये पाणी गेल्यामुळे होणारे नुकसान, फोनची स्क्रीन खराब झाल्यासही विम्यात तो खर्च कव्हर होतो. मोबाइल फोनची चोरी झाल्यानंतर डेटा गेल्यामुळे आर्थिक भार वाढण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी मोबाइल विमा गरजेचा ठरतो. फोन तुटला तरी दुरुस्तीचा खर्च विम्यातून भरून निघतो. महागडे मोबाइल दुरुस्त करून घेणे खर्चीक ठरते. अशावेळी विमा तुमच्या मदतीला येतो. वॉरंटी कालावधीत फोन हरवला तर त्याची भरपाई केली जात नाही. पण, जर तुम्ही मोबाइल इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला संपूर्ण नुकसानभरपाई मिळते.
काय कव्हर होत नाही?
- मोबाइल चोरीला गेल्याची योग्य माहिती न दिल्यास.
- मोबाइल जाणूनबुजून खराब केला असल्यास.
- दुसरा कोणीतरी मोबाइल वापरत असल्यास.
- आधीच काही समस्या असतील तर विम्यामध्ये संरक्षण मिळत नाही.
मिळतात या सुविधा...
- अनेक विम्यांमध्ये मोबाइल दुरुस्तीसाठी डोअरस्टेप पिकअप आणि ड्रॉपची सुविधाही उपलब्ध आहे.
- कॅशलेस प्रोसेचची सुविधाही ग्राहकाला मिळते. काही विमा कंपन्या नो क्लेम बोनसची सुविधाही देतात.