Success Story OLA: भांडणांमुळे नेहमीच समस्या निर्माण होतात, पण कधी भांडणामुळे एखाद्या समस्येचं निराकरण झाल्याचं ऐकलंय का? आता तुम्ही म्हणाल नक्की हे आहे काय? आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीची यशोगाथा सांगणार आहोत ज्याच्या आयुष्याला एका छोट्या वादामुळे मोठं वळण मिळालं आणि ज्यानं त्याला व्यवसायाची एक अनोखी कल्पना दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय इतका यशस्वी झाला की आज त्याची देशभरात चर्चा आहे.
आजकाल जवळपास सगळ्याच ठिकाणी ओला कॅब पाहिली असेल आणि कधी प्रवासही केला असेल. ओलाची सुरुवात आयआयटी ग्रॅज्युएट भाविश अग्रवाल यांनी केली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एका वादामुळे ही कॅब सेवा सुरू करण्याची कल्पना त्यांना आली. आम्ही तुम्हाला देशातील आघाडीच्या आणि यशस्वी कॅब स्टार्टअपची कहाणी सांगत आहोत.
वादानं दिली जीवनाला कलाटणी
ओला कॅब्स सेवा सुरू करण्याची कल्पना भाविश अग्रवाल यांना सुचली जेव्हा ते प्रवासादरम्यान एका टॅक्सी चालकाची मनमानी सहन करावी लागली. ज्याचं भाडं कमी असेल, चालक प्रवाशासोबत जबाबदारी वागेल आणि कोणत्याही ठिकाणाहून टॅक्सी सहज मिळेल अशा सेवेची गरज असल्याचं यानंतर भाविश यांच्या लक्षात आलं.
प्रत्यक्षात घडलं असं की भाविश अग्रवाल वीकेंडला त्यांच्या मित्रांसोबत टॅक्सीनं बंगळुरूहून बांदीपूरला जात होते. यादरम्यान कार चालकानं गाडी मध्येच थांबवली आणि ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्त पैशांची मागणी सुरू केली. समजावल्यानंतरही ड्रायव्हर मान्य झाला नाही, त्यानंतर भाविश आणि त्यांच्या मित्रांना बसनं बांदीपूरला जावे लागले. टॅक्सी चालकाशी झालेल्या या वादानंतर ओला टॅक्सी सेवा सुरू करण्याचा विचार भाविश यांच्या मनात आला.
सहजरित्या कुटुंबीय मानले नाहीत
मात्र, नोकरी सोडून कॅब सेवा सुरू करण्याचा निर्णय इतका सोपा नव्हता. कारण, जेव्हा त्यांनी त्यांची योजना कुटुंबातील सदस्यांना सांगितली तेव्हा त्यांनी ते मान्य केलं नाही. मुलगा मोठी आयटी कंपनी सोडून ट्रॅव्हल एजन्सीचं काम करेल असं त्यांना वाटलं. पण, भाविश अग्रवाल यांनी परवडणाऱ्या कॅब सेवेचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला होता. २०११ मध्ये त्यांनी अंकित भाटीसह बंगळुरूमध्ये ओला कॅब सुरू केली.
ओला कॅबच्या कल्पनेला देशात प्रचंड यश मिळालं. परिस्थिती अशी आहे की आज देशातील कोट्यवधी लोकांच्या स्मार्टफोनमध्ये ओला अॅप उपलब्ध आहे आणि जेव्हा जेव्हा कार, ऑटो किंवा बाईक बुक करण्याचा विचार येतो तेव्हा लोक ओलाला प्राधान्य देतात.
डीएनएच्या रिपोर्टनुसार, ओला कॅबचे मूल्यांकन ४.८ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३९८३२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय भाविश अग्रवाल यांनी २०१७ मध्ये ओला इलेक्ट्रिक नावाची दुसरी कंपनी सुरू केली. ही कंपनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवते. गेल्या वर्षी त्यांनी सुमारे २४०० कोटी रुपये (३०० मिलियन डॉलर्स) उभे केले होते. २०२२ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ११७०० कोटी रुपये होती.