Join us

Arkade developers share: लिस्टिंगच्या दिवशी ४८% टक्क्यांनी वधारलेला शेअर; आता तिमाही निकालानंतर पुन्हा बनला रॉकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 1:30 PM

Arkade developers share: शुक्रवारी कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात तुटून पडल्याचे दिसून आले. या कंपनीनं गेल्या महिन्यात आयपीओद्वारे ४१० कोटी रुपये उभे केले होते.

Arkade developers share: शेअर बाजारात नुकत्याच लिस्ट झालेल्या रिअल इस्टेट कंपनी आर्केड डेव्हलपर्स लिमिटेडनं जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. दरम्यान, शुक्रवारी कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात तुटून पडल्याचे दिसून आले. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा शेअर २.६१ टक्क्यांनी वधारून १६३.३० रुपयांवर पोहोचला. ट्रेडिंग दरम्यान शेअरचा भाव १७२.७० रुपयांवर पोहोचला.

नफ्यात चार पटीने वाढ

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीचा नफा चार पटीने वाढून ३०.२१ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ६.५७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचं एकूण उत्पन्न दुप्पट होऊन १२५.५१ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. 

आर्केड डेव्हलपर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) अमित जैन यांच्या मते, वाढते शहरीकरण आणि वाढत्या उत्पन्नामुळे भारतीय रिअल इस्टेट मार्केट, विशेषत: लक्झरी हाऊसिंग सेगमेंटला जोरदार मागणी आहे.

गेल्या महिन्यात आला होता IPO

आर्केड डेव्हलपर्स लिमिटेडनं गेल्या महिन्यात आयपीओद्वारे ४१० कोटी रुपये उभे केले होते. बीएसईवरील इश्यू प्राइसच्या तुलनेत हा शेअर ३७.४२ टक्क्यांनी वधारून १७५.९० रुपयांवर लिस्ट झाला. नंतर तो ४८.४३ टक्क्यांनी वधारून १९० रुपयांवर पोहोचला. अखेर तो २९.५७ टक्क्यांनी वधारून १६५.८५ रुपयांवर बंद झाला. एनएसईवर हा शेअर ३६.७१ टक्क्यांनी वधारून १७५ रुपयांवर खुला झाला. त्यानंतर हा शेअर २९.२५ टक्क्यांनी वधारून १६५.४५ रुपयांवर बंद झाला.

आयपीओची इश्यू प्राईज

आर्केड डेव्हलपर्स लिमिटेडने आपल्या ४१० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी १२१ ते १२८ रुपये प्रति शेअर इश्यू प्राइस बँड निश्चित केला होता. आयपीओमधून मिळणारी रक्कम कंपनीचे सध्याचे आणि भविष्यातील विकास प्रकल्प, भविष्यातील रिअल इस्टेट प्रकल्पांचं अधिग्रहण आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल, असं कंपनीनं तेव्हा म्हटलं होतं.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक