कोरोना काळात मुकेश अंबानींच्यारिलायन्स ग्रुपने फेसबुकसारख्या मोठमोठ्या कंपन्यांच्या साथीने एकामागोमाग एक अशा रिटेल क्षेत्रातील बड्या कंपन्या विकत घ्यायचा सपाटा सुरु केला होता. यावर जगप्रसिद्ध कंपनी अॅमेझॉननं रिलायन्स रिटेलच्या एका मोठ्या डीलमध्ये अडचण निर्माण केली आहे. मुकेश अंबानींना मोठा झटका बसला आहे. पाच महिन्यांपूर्वी अंबानींच्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडनं (RRVL) फ्यूचर ग्रुप (Future Group) रिटेल आणि होलसेल बिझनेस तसंच लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग बिझनेस खरेदी केला होता. या डीलवर जगातील सर्वात मोठे अब्जाधीश जेफ बेजोस यांच्या अॅमेझॉननं आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयानं अंबानींना झटका देत या डीलला स्थगिती दिली होती. दरम्यान, ही डील यशस्वी झाली नाही तर ११ लाख कर्मचाऱ्यांना आपला रोजगार गमवावा लागू शकतो अशी शक्यता दिल्लीतील एनजीओ पब्लिक रिस्पॉन्स अगेन्स्ट हेल्पलेसनेस अँड अॅक्शन फॉर रिड्रेसल (PRAHAR) यांच्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
फ्युचर ग्रुप आणि रिलायन्सनं या डीलद्वारे बिग बाझार, ईझी डे, निलगीरीज, सेंट्रल आणि ब्रँड फॅक्टरीसारख्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी गमवावी लागू नये याची काळजी घेतली आहे. तसंच यांच्यासोबत काम करणाऱ्या सप्लायर्सचा व्यवसायदेखील सुरू राहावा याची काळजी घेण्यात आली आहे. जर ही डील यशस्वी झाली नाही, तर देशभरातील ४५० शहरांमध्ये असलेली फ्युचर समूहाची २ हजार स्टोअर्स बंद होतील. यामुळे जवळपास ११ लाख लोकं बेरोजगार होतील. तसंच ६ हजार वेंडर्स आणि सप्लायर्स आपले ग्राहक गमावतील, असं त्यांनी आपल्या अहवालात नमूद केलं आहे.
कायदेशीर लढाई सुरू
PRAHAR नं बाजारातील स्पर्धेला महत्त्व असल्यावर जोर देत सांगितलं की रिलायन्सनं या डीलअंतर्गत सर्व वेंडर्स आणि सप्लायर्सना त्यांच्यी शिल्लक रक्कम फेडण्याचं आश्वासन दिलं आहे. फ्युचर रिटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांची आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या वेंडर्स आणि सप्लायर्सच्या हितांचं संरक्षण होणं आवश्यक असल्यंचही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. फ्युचर ग्रुपचे रिटेल, लॉजिस्टीक आणि वेअर हाऊसिंग असेस्ट्स रिलायन्स रिटेल व्हेंचर्सला विकण्याच्या मुद्द्यावरून अॅमेझॉन आणि फ्य़ुचर ग्रुपमध्ये कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही डील २४,७१३ कोटी रूपयांना करण्यात आली आहे.