Join us

नीरव मोदीला बेड्या ठोका, लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 9:41 PM

काही दिवसांपूर्वीच नीरव मोदी लंडनमधील रस्त्यांवर फिरताना दिसून आला होता. त्यानंतर, त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

लंडन - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरार आरोपी नीरव मोदी याच्या पत्नीविरोधात लंडनच्यान्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे लवकरच नीरव मोदीला बेड्या ठोकण्यात येऊ शकतात. तर, भारतानेही नीरव मोदीला भारताकडे सोपिवण्याची मागणी इंग्लंडकडे केली आहे.  

नीरव मोदीविरुद्ध विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नीरव मोदीविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत विशेष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी नीरव मोदीची पत्नी आमी मोदी हिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी होते. त्यानंतर, आता लंडनमधील न्यायालयानेही नीरव मोदीला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. 

आमी हिने बँकेकडून घेतलेल्या कर्जातून न्यूयॉर्क येथील पॉश सेंट्रल पार्क परिसरात प्रॉपर्टी विकत घेण्यात आली. अमेरिकेत मोदीच्या दोन स्थावर मालमत्ता आहेत. ईडीने त्या जप्त केल्या आहेत. आमीच्या नावावर सेंट्रल पार्कमधील मालमत्ता असल्याने तिच्याविरुद्धही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची ईडीची विनंती विशेष न्यायालयाने मान्य केली होती. तिने बँकेचे पैसे मोदीची बहीण पूर्वीद्वारे वळते करून त्याच पैशातून सेंट्रल पार्कमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली. दरम्यान, विशेष न्यायालयाने मोदीच्या काही कंपन्यांना समन्स बजाविले. या कंपन्यांनी तपास यंत्रणेवर आरोप केले आहेत. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, मोदीने अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांचा वापर तो लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) घेण्यासाठी करायचा. कंपन्यांचे एलओयू वापरून नीरव मोदी पीएनबीमधून कर्ज घेत होता. हा घोटाळा उजेडात आल्यानंतर मोदी देश सोडून लंडनमध्ये पळाला. सध्या तो लंडनच्या सेंटर पॉइंट टॉवर ब्लॉकमध्ये राहत असल्याचा दावा इंग्लंडच्या एका वर्तमानपत्राने केला आहे. त्यांनी त्याचे व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत.

टॅग्स :नीरव मोदीलंडनन्यायालयअटकपोलिस