Lokmat Money > बिझनेस न्यूज > सायरस मिस्त्री प्रकरणाचा चटका...

सायरस मिस्त्री प्रकरणाचा चटका...

रतन टाटा यांना 2016 मध्ये सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर करावे लागले. ही घटना टाटा समूहाच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखली जाते. रतन टाटांसाठी व्यक्तिशः हा निर्णय अतिशय क्लेशदायक होता...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 08:34 AM2024-10-13T08:34:22+5:302024-10-13T08:36:38+5:30

रतन टाटा यांना 2016 मध्ये सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर करावे लागले. ही घटना टाटा समूहाच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखली जाते. रतन टाटांसाठी व्यक्तिशः हा निर्णय अतिशय क्लेशदायक होता...

Article about tata group and Cyrus Mistry case | सायरस मिस्त्री प्रकरणाचा चटका...

सायरस मिस्त्री प्रकरणाचा चटका...

नितीन पोतदार, कॉर्पोरेट लॉयर

रतन टाटांची कहाणी म्हणजे एका यशस्वी उद्योजकाचीच नव्हे भारतासारख्या खंडप्राय देशाच्या शिल्पकाराची यशोगाथा आहे. १९६१ साली जेव्हा ते टाटा समूहात सामील झाले तेव्हापासून त्यांनी जसे हजारो प्रोडक्ट्स बनवले, तसेच लाखो लोकांच्या हाताला काम दिले तर शेकडो लोकांमधील नेतृत्व गुण शोधून त्यांना विश्वासाने अधिकार दिले. अशा अफाट प्रवासात सायरस मित्री हे एक प्रकरण असे होते की, ते त्यांच्यासाठी अतिशय त्रासदायक ठरले. वैयक्तिक आणि सार्वजनिक अशा दोन्ही दृष्ट्या.

टाटा समूहाची २१ वर्षे धुरा सांभाळल्यानंतर रतन टाटा २०१२ साली निवृत्त झाले आणि त्यांनी खूप विचारांती आपला उत्तराधिकारी म्हणून युवा उद्योजक सायरस मिस्त्री यांना निवडले. मिस्त्री यांच्या अनेक निर्णयांवरून टाटा समूहात मतभेद निर्माण झाले. पुढे ते एवढे विकोपाला गेले की, रतन टाटा यांना २०१६ मध्ये मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर करावे लागले. ही घटना टाटा समूहाच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखली जाते.

रतन टाटांसाठी व्यक्तिशः हा निर्णय अतिशय क्लेशदायक होता. कारण ज्या व्यक्तीला आपण उत्तराधिकारी म्हणून नेमले तिलाच काढून टाकण्याचे मोठे धर्मसंकट त्यांच्यासमोर होते. शापूरजी पालनजी मिस्त्री आणि टाटा घराण्यांचे तब्बल ८० वर्षे जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते. पालनजी यांची मुलगी रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. याशिवाय पालनजी यांची स्वतः टाटा सन्समध्ये १८ टक्के भागीदारी होती आणि त्यांनी टाटा सन्सच्या डायरेक्टर बोर्डवर २५ वर्षे काम केले होते. रतन टाटा यांची जेव्हा जे. आर. डी. टाटा यांचे वारसदार म्हणून नेमणूक झाली तेव्हा पालनजी घराणे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा दिला होता. अगदी १९९६ मध्ये रतन टाटा यांनी टाटा स्टीलचे रुसी मोदी, टाटा केमिकल्सचे दरबारी सेठ आणि इंडियन हॉटेल्सचे अजित केरकर या बड्या अधिकाऱ्यांना समूहातून हटवण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही पालनजी यांनी त्यांना भक्कम समर्थन दिले होते.

साहजिकच मिस्त्री यांच्या वादग्रस्त हकालपट्टीमुळे टाटा आणि पालनजी यांच्या संबंधांत कमालीची कटुता आली. पुढे हे प्रकरण थेट न्यायालयामध्ये गेले. असे टाटा समूहात कधी घडले नव्हते. आजवरचे सर्व अध्यक्ष सन्मानाने निवृत्त झाले होते. पण या प्रकरणामुळे टाटा समूह वादाच्या भोवऱ्यात सापडला. पण खरा नेता तोच असतो जो अशा कसोटीच्या घडी न डगमगता प्रामाणिकपणे आपली चूक मान्य करत ती सुधारण्यासाठी कठोर निर्णय घेतो आणि तितक्याच कठोरपणे अंमलबजावणी करतो. या निर्णायक क्षणी रतन टाटा यांच्यामधील खंबीर नेत्याचे दर्शन जगाला घडले.

या संपूर्ण लढाईला ते धीरोदात्तपणे सामोरे गेले आणि तावून सुलाखून बाहेर पडले. हे प्रकरण त्यांनी नुसतंच काळजीपूर्वक हाताळले आणि त्यातून टाटा समूहाला त्याच्या प्रतिष्ठेला कोणताही धक्का बसणार नाही, याची दक्षता घेत सही सलामत बाहेर काढले. कुठल्याही प्रकारचे वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप न करता, कसलेही आकांडतांडव न करता ही लढाई सर्व उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करत संयमाने त्यांनी जिंकली.

त्यावेळी चालू असलेल्या धुमश्चक्रीत रतन टाटा यांचे नेतृत्व किती प्रखरतेने झळाळून निघाले होते, याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. कारण या न्यायालयीन लढाईआधी टाटा समूहाने जो कायदेशीर सल्ला (लीगल ओपिनीयन) घेतला होता, त्या हाय-व्होल्टेज प्रक्रियेचा मी स्वतः एक मुख्य भाग होतो. (आधी अजित केरकर बाबतीतदेखील लीगल ओपिनीयन घेताना माझा सहभाग होता). त्यामुळे सायरस मिस्त्रींना काढणे बरोबर होते की, चूक याविषयी मी उहापोह करणार नाही. पण एक नक्की सांगू शकतो की, वयाच्या ऐंशीव्या वर्षीही द्रष्टेपणाने एखाद्या खंबीर नेत्याप्रमाणे ते झुंजले आणि धाडसाने जिंकलेसुद्धा. हे एका खंबीर नेत्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. याच गुणाच्या आधारे त्यांनी टाटांचे नव्हे तर भारतालादेखील जागतिक पातळीवर एक मानाचे स्थान प्राप्त करून दिले. त्यांना मनापासून प्रणाम!! 

Web Title: Article about tata group and Cyrus Mistry case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.