मुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्र आज अत्याधुनिक होत आहे. हे अत्याधुनिकीरण २०२५ पर्यंत प्रत्येकाच्या घरात पोहोचणार आहे. घर उभारतानाही इंटरनेट आॅफ थिंग्सचा व आर्टिफिशिअल इंटलिजन्सचा उपयोग होईल. त्यातून हे संपूर्ण क्षेत्र सुमारे २० लाख कोटी रुपयांचे असेल, असे मत सीआयआयच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) पायाभूत सुविधांसंबंधीच्या चर्चासत्रात बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी इंटरनेट आॅफ थिंग्स (आयओटी) व आर्टिफिशिअल इंटलिजन्स (एआय) यांचा घर बांधकाम क्षेत्रावर मोठा प्रभाव असेल, असे मत मांडले.झपाट्याने होणारे शहरीकरण व शहरांमधील वाढती लोकसंख्या, यामुळे येत्या काळात एफएसआय व बांधकाम नियमावलीत मोठे बदल होतील. घरेही छोटी होत जातील, पण छोट्या घरांमध्ये स्मार्ट सोईसुविधा देणे अनिवार्य असेल. त्यामध्ये आयओटी व एआयची भूमिका मोठी असेल, असे टाटा रिअॅलिटीचे सीईओ संजय दत्त म्हणाले.रिअल इस्टेट सल्लागार सेवा देणाऱ्या सीबीआरईचे व्यवस्थापकीय संचालक गुर्जोत भाटिया यांनी बांधकाम क्षेत्राच्या अत्याधुनिकीकरणावर प्रकाश टाकला. प्रत्येक घरात सोईसुविधांवर एआयचा प्रभाव असेलच. कार्यालय बांधतानाही याच तंत्रज्ञानाचा खूप वापर होईल.कार्यालयांमधील अनेक कामे स्वयंचलित होतील. त्यासंबंधीच्या क्षेत्रातील उलाढाल १० लाख कोटी रुपयांची असेल, असे ते म्हणाले. सीआयआय महाराष्टÑचे माजी अध्यक्ष सुनील खन्ना यांनीही आयओटी ही चौथी औद्योगिक क्रांती असेल, असे मत मांडले.
२०२५ पर्यंत घराघरांत असेल आर्टिफिशिअल इंटलिजन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 3:11 AM