नवी दिल्ली : भारताने असमानता दूर करण्यावर भर देण्यापेक्षा गरिबी दूर करण्यावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन नीती आयोगाचे मावळते उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी केले.येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पनगढिया म्हणाले की, संधी, आरोग्य आणि शिक्षण सेवा उपलब्ध करून देण्यात समानता आणण्याची गरज आहे. गरिबी निर्मूलनाला प्राधान्य द्यायचे की, असमानता कमी करण्यास यावरून गंभीर संघर्ष आहे. मी संधी, आरोग्य आणि शिक्षण उपलब्ध करून देण्यात समानता असावी, या मुद्यावर भर देईन. यांचा संबंध गरिबी निर्मूलनाशी आहे.एका कालखंडात (१९६०-७०) आम्ही असमानतेबाबत अधिक चिंता केली. ती आमची धोरणात्मक चूक होती. असमानता ही अत्यंत गुंतागुंतीची आणि बहुआयामी समस्या आहे. भारतासारख्या विकसनशील देशांत असमानता निर्मूलनापेक्षा गरिबी निर्मूलनाला अधिक महत्त्व देण्याची गरज आहे. श्रीमंत देशांसाठी असमानता ही मोठी समस्या आहे; पण भारतासाठी गरिबी निर्मूलन त्यापेक्षा महत्त्वाचे आहे.गिनी निर्देशांकानुसार केरळ हे सर्वाधिक असमानता असलेले राज्य आहे, तर बिहार हे सर्वाधिक समानता असलेले राज्य आहे! या पार्श्वभूमीवर गरिबी निर्मूलनावरच अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.अरविंद पनगढिया, उपाध्यक्ष, नीती आयोग
असमानतेपेक्षा गरिबी निर्मूलनावर भर द्यावा, अरविंद पनगढिया यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 2:43 AM