Join us

मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 2:17 PM

भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनांमध्ये कार्सिनोजेनिक केमिकल इथिलीन ऑक्साईडचा (ईटीओ) वापर रोखण्यासाठी मसाला बोर्डानं (Spices Board) निर्यातदारांना मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत.

भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनांमध्ये कार्सिनोजेनिक केमिकल इथिलीन ऑक्साईडचा (ईटीओ) वापर रोखण्यासाठी मसाला बोर्डानं (Spices Board) निर्यातदारांना मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. काही मसाल्यांच्या उत्पादनांबाबत काही देशांनी अलीकडेच व्यक्त केलेल्या गुणवत्तेच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलंय. 

काय आहेत मार्गदर्शक तत्त्वं? 

मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्यातदारांनी मसाल्यांमध्ये ईटीओ केमिकलचा वापर टाळावा. त्याचबरोबर वाहतूक, साठवणूक/गोदाम, पॅकेजिंग मटेरियल पुरवठादार कोणत्याही स्तरावर या रसायनाचा वापर करणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पुरवठा साखळीतील मसाले, मसाला उत्पादनांमध्ये ईटीओ आणि त्याचे मेटाबोलाइट नसल्याचं सुनिश्चित करण्यासाठी निर्यातदारांना पुरेशा उपाययोजना कराव्या लागतील. 

ही परिस्थिती का निर्माण झाली? 

हाँगकाँग आणि सिंगापूरने लोकप्रिय मसाला ब्रँड एमडीएच आणि एव्हरेस्टच्या विक्रीवर बंदी घातल्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली आहेत. त्यांच्या उत्पादनांमध्ये कार्सिनोजेनिक केमिकल इथिलीन ऑक्साईड आढळल्यानंतर ही उत्पादने स्टोअरमधून परत मागविण्यात आली. 

कोणत्या मसाल्यांवर बंदी आहे 

हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा केंद्रानं (सीएफएस) ग्राहकांना एमडीएचची मद्रास करी पावडर (मद्रास करीसाठी मसाला मिश्रण), एव्हरेस्ट फिश करी मसाला, एमडीएच सांबार मिश्रित मसाला पावडर आणि एमडीएच करी पावडर मिश्रित मसाला पावडर खरेदी करू नये आणि व्यापाऱ्यांना विक्री करू नये असं सांगितलं होतं. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताची मसाल्यांची निर्यात ४.२५ अब्ज डॉलर्स होती, जी जागतिक मसाला निर्यातीच्या १२ टक्के आहे. 

निर्यातीवर परिणाम होण्याची भीती 

'या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये ७० कोटी डॉलरची निर्यात धोक्यात आली आहे. अनेक देशांतील नियामक कारवाईमुळे मसाल्याच्या निर्यातीतील निम्म्याचं नुकसान होऊ शकतं. भारतानं गुणवत्तेचे प्रश्न त्वरीत आणि पारदर्शकतेने सोडवण्याची गरज आहे,' असं मसाल्यांबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संशोधन संस्था ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हनं (जीटीआरआय) एका अहवालात म्हटलं.

टॅग्स :व्यवसायसिंगापूर