दिग्गज टेक कंपनी अॅपलच्या iPhone 16 ची विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. कंपनीने ९ सप्टेंबर रोजी आपल्या इट्स ग्लोटाइम या वर्षातील सर्वात मोठ्या कार्यक्रमामध्ये एआय फिचरसह आयफोन १६ सीरिज लॉन्च केली होती. दरम्यान, आज मुंबईतील बीकेसी येथील स्टोअरमध्ये विक्री सुरू होण्यापूर्वीच आयफोन खरेदीसाठी ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या. मुंबईबरोबरच दिल्लीमधील आयफोनच्या स्टोअरबाहेरही असंच चित्र दिसून आलं.
अॅपल स्टोअर उघडण्याच्या आधीच सकाळी सकाळी लोकांनी स्टोअरच्या बाहेर गर्दी केली होती. iPhone 15 लॉन्च झाला होता, तेव्हाही अशाच प्रकारची उत्सुकता दिसून आली होती. मुंबईप्रमाणेच दिल्लीमधील साकेत येथील अॅपल स्टोअरबाहेरही लांबच्या लांब रांगा दिसून आल्या. दरम्यान, उज्ज्वल शाह नावाच्या एका ग्राहकाने सांगितले की, मी मागच्या २१ तासांपासून रांगेत उभा आहे. काल सकाळी मी येथे आलो होतो. आता आज सकाळी स्टोअरमध्ये प्रवेश करणारी पहिली व्यक्ती असेन.
iPhone 16 सीरिजमध्ये चार फोन लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला डिझाइनपासून ते फिचर्स पर्यंत खूप काही नवीन सुविधा मिळणार आहेत. मात्र iPhone 16 सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे अॅपलने नव्या iPhone ची किंमत ही आधीच्या मॉडेलपेक्षा कमी ठेवली आहे. विशेषकरून भारतामध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे.