Join us

Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 8:28 AM

पतंजली फूड्स लिमिटेड या प्रामुख्याने खाद्यतेलाच्या व्यवसायात गुंतलेल्या कंपनीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. वाचा काय म्हटलंय कंपनीनं?

पतंजली फूड्स लिमिटेड या प्रामुख्याने खाद्यतेलाच्या व्यवसायात गुंतलेल्या कंपनीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. प्रवर्तक समूह पतंजली आयुर्वेदाच्या गैर-खाद्य व्यवसायाचं अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावाचं मूल्यांकन करणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. दरम्यान, पतंजली फूड्स लिमिटेडनं ते विकत घेण्याच्या विचारात असलेल्या गैर-खाद्य उत्पादनांच्या श्रेणींचा उल्लेख केलेला नाही. वृत्तसंस्था पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेंटल केअर, पर्सनल केअर यासारखी उत्पादनं मिळवण्याचा विचार पतंजली फूड्स करणार आहे. बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील प्रवर्तक समूहाच्या एकूण व्यवसायात या उत्पादनांचा वाटा ५०-६० टक्के आहे. 

काय म्हटलंय कंपनीनं? 

पतंजली फूड्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, पतंजली आयुर्वेद लिमिटेडकडून आपल्या नॉन-फूड बिझनेस व्हेंचरच्या विक्रीसाठी मिळालेल्या प्राथमिक प्रस्तावावर पतंजली फूड्सच्या संचालक मंडळानं चर्चा केली आहे. पतंजली आयुर्वेदच्या नॉन-फूड पोर्टफोलिओशी समन्वय वाढविण्याच्या सर्वात कार्यक्षम मार्गाचं मूल्यांकन करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळानं तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्याची छाननी करणं, व्यावसायिकांची नेमणूक करणं, प्रस्तावातील अटी व शर्तींवर चर्चा करणं आणि ऑडिट समिती व निष्कर्ष पुढील विचारासाठी कळविण्याचे अधिकारही मंडळानं कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

बिस्किट व्यवसायाचं केलेलं अधिग्रहण 

पतंजली फूड्सने आपल्या उत्पादनांची स्थिती मजबूत करण्यासाठी मे २०२१ मध्ये पतंजली नॅचरल बिस्कीट प्रायव्हेट लिमिटेडचा बिस्किट व्यवसाय ६०.०३ कोटी रुपयांना विकत घेतला होता. जून २०२१ मध्ये नूडल्स आणि स्नॅक व्यवसाय ३.५० कोटी रुपयांना आणि मे २०२२ मध्ये पतंजली आयुर्वेदकडून ६९० कोटी रुपयांना फूड विकत घेतला होता. 

१९८६ साली अस्तित्वात आलेली पतंजली फूड्स लिमिटेड यापूर्वी रुची सोया इंडस्ट्रीज या नावानं ओळखली जात होती. ही आघाडीची एफएमसीजी कंपनी आहे.

टॅग्स :रामदेव बाबापतंजली