गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात मोठी वाढ केली आहे. यानंतर सर्वच कर्जांचे हप्ते मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पुन्हा एकदा दरवाढीचे संकेत दिले आहेत. बुधवारी ते सीआयआयच्या वार्षिक संमेलनात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी महागाई, व्याजदरांसह थकित कर्ज आणि आर्थिक स्थितीवर भाष्य केलं.
व्याजदरातील बदल आमच्या नियंत्रणात नाही. परिस्थिती लक्षात घेऊन एमपीसी हा निर्णय घेते. महागाईविरोधात लढा सुरू आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यातील महागाई दर कमी राहण्याची शक्यता असल्याचे शक्तिकांत दास म्हणाले. “जागतिक अर्थव्यवस्थेवर जियो पॉलिटिकल दबाव दिसून येत आहे. पुरवठा साखळीतील समस्या कमी झाल्यामुळे जागतिक विकासाला पाठिंबा मिळत आहे, ही दिलासादायक बाब आहे. जागतिक अनिश्चितता असूनही भारतीय बँकिंग व्यवस्था मजबूत स्थितीत आहे. आर्थिक क्षेत्राच्या स्थिरतेमुळे विकासाला आधार मिळतोय,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कृषी क्षेत्राची चांगली कामगिरी
देशाचे सेवा क्षेत्र अतिशय उत्तम काम करत आहे. याशिवाय कृषी क्षेत्रातही चांगली वाढ दिसून आली. खाजगी कंपन्यांकडूनही गुंतवणुकीत वाढ दिसून आली आहे. दरम्यान, एल निनो हा कृषी क्षेत्रासाठी चिंतेचा विषय राहिला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. “परदेशातून येणारे पैसे विक्रमी पातळीवर येत आहेत. परंतु भारताला तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक गुंतवणूकीची गरज आहे. तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढवण्यात अनेक समस्या आहेत. खासगी क्षेत्राकडून तंत्रज्ञानातील गुंतवणूकीबाबत सरकारला मोठ्या अपेक्षा आहेत,” असं दास म्हणाले.
फॉरेक्स व्यवस्थापनावर सक्रियरिझर्व्ह बँकेने गंगाजळी सुधारण्यासाठी फॉरेक्स इनफ्लोचा वापर केला. रिझर्व्ह बँक फॉरेक्स व्यवस्थापनावर सक्रिय आहे. यासाठी आमचं लक्ष एक्सचेंज रेटच्या स्थिरतेवर आहे. जागतिक स्तरावर १८ देशांसोबत रुपयाच्या व्यापाराला मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत रुपयात व्यवहार करण्यासाठी ६५ व्होस्ट्रो खाती उघडण्यात आल्याची माहितीही दास यांनी यावेळी दिली.