सरकार आपल्या मालकीची आयुर्वेद कंपनी इंडियन मेडिसिन्स फार्मास्युटिकल कॉर्पोरेशनची (IMPCL) विक्री करण्याच्या तयारीत आहे. मॅनकाइंड फार्मा आणि बैद्यनाथ आयुर्वेद यांनी या सरकारी कंपनीतील १०० टक्के स्टेक खरेदी करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (लेटर ऑफ इंटरेस्ट किंवा EoI) सबमिट केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी फार्मास्युटिकल कंपनीसाठी खासगी इक्विटी फंड आणि असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनीनंही बोली लावली आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
पतंजली आयुर्वेदानंही सरकारी कंपनीसाठी बोली प्रक्रियेत भाग घेणे अपेक्षित होतं. परंतु, पतंजली आयुर्वेदानं एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) सादर करण्यास नकार दिला आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी ३० ऑक्टोबर रोजी ट्विट केले होतं. 'इंडियन मेडिसिन फार्मास्युटिकल कॉर्पोरेशनच्या (IMPCL) निर्गुंतवणुकीसाठी अनेक EoI प्राप्त झाले आहेत. आता हा व्यवहार दुसऱ्या टप्प्याकडे जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
२५० कोटींचा होता महसूल
आर्थिक वर्ष २०२२ मध्ये, सरकारी औषध कंपनी इंडियन मेडिसिन्स फार्मास्युटिकल कॉर्पोरेशनचा (IMPCL) महसूल २५० कोटी रुपये होता आणि प्रॉफिट मार्जिन सुमारे २५ टक्के होते. ही सरकारी कंपनी १९७८ साली सुरू झाली होती. ही कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम अंतर्गत (CGHS) चालणाऱ्या डिस्पेन्सरीज आणि क्लिनिक्सना औषधांचा पुरवठा करते.
कंपनी सध्या ६५६ क्लासिकल आयुर्वेदिक, ३३२ युनानी आणि ७१ प्रोप्रायटरी आयुर्वेदिक औषधं तयार करते. कंपनी राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत सर्व राज्यांना आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचा पुरवठा करते. याशिवाय कंपनी ६ हजार जन औषधी केंद्रांना औषधांचा पुरवठा करते. ही कंपनी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येते.