- प्रसाद गो. जोशीप्रारंभीच अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या मोठ्या विक्रीने घसरलेला शेअर बाजार त्यानंतर भारत- पाकिस्तानच्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे आणखी खाली आला. युद्धाच्या भीतीमुळे बाजारात सावध हालचाली होत आहेत.परकीय विवसंस्थांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराची घसरण काही प्रमाणात भरून निघालेली दिसत आहे. मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताहात अस्वलाचा जोर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहाच्या अखेरीस २७८९५.९६ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये त्यामध्ये ८०२.२६ अंश म्हणजेच २.८० टक्कयांनी घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २२०.४० अंश म्हणजे २.५० टक्कयांनी घसरून ८६११.१५ अंशांवर बंद झाला. बाजाराचे जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांक सप्ताहाच्या अखेरीस लाल रंगामध्ये बंद झालेले दिसून आले.सप्ताहाच्या प्रारंभीच अमेरिकेसह युरोपातील शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आल्याने सर्वच बाजारांमध्ये घसरण झाली. त्याचा परिणाम भारतातील शेअर बाजारांमध्ये घसरणीने झाला. त्यापाठोपाठ भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल कारवाईने बाजाराच्या काळजीमध्ये मोठीच वाढ झाली. या सर्जिकल कारवाईमुळे भारत- पाक सीमेवरील तणाव आणखी वाढला असून यामुळे बाजारावर असलेली अस्वलाची पकड आणखी घट्ट झाली आहे.भारतात परकीय वित्तसंसथांकडून सुरू असलेली खरेदी मागील सप्ताहातही कायम राहिली. कमी झालेल्या किंमतीत खरेदीची संधी या संस्थांनी सोडली नाही. वित्तसंस्थांनी गतसप्ताहामध्ये ३१९२१.८३ कोटी रुपयांची खरेदी केली तर २७१२१.८३ कोयी रुपयांची विक्री केली. म्हणजेच सप्ताहामध्ये या संस्थांनी ४७९९.८० कोटी रुपयांची खरेदी केली. आगामी सप्ताहामध्ये अनेक महत्वपूर्ण घडामोडी होणार आहेत. >आठवड्यातील घडामोडी1. जगभरात विक्रीच्या माऱ्यामुळे भारतामध्येही मोठी विक्री. 2. परकीय वित्तसंस्थांकडून भारतीय बाजारात खरेदी मागील सप्ताहातही सुरूच. 3. चालू कॅलेंडर वर्षात म्युच्युअल फंडांनी इक्विटी योजनांमध्ये गुंतविले १३,५०० कोटी रुपये. 4. सप्टेंबर महिन्यात परकीय वित्तसंस्थांनी २० हजार कोटींहून अधिक रुपये भारतात गुंतविले.
सीमेवरील तणावाच्या भीतीमुळे अस्वलाची पकड
By admin | Published: October 03, 2016 6:27 AM