नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने 'भारत पे'चा (BharatPe) माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हरला (Ashneer Grover) 'भारत पे'च्या विरोधात सोशल मीडिया पोस्ट केल्याबद्दल मंगळवारी 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला. कंपनीविरोधात पोस्ट करणार नाही, असे आश्वासन अश्नीरने न्यायालयाला दिले होते. आता ही पोस्ट टाकल्याबद्दल अश्नीर ग्रोव्हरने दिल्ली उच्च न्यायालयात माफीही मागितली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायालयाने सांगितले की, अश्नीर ग्रोव्हरच्या वर्तनामुळे कोर्टाला धक्का बसला आहे. तसेच कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ग्रोव्हरवर हा 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
काय पोस्ट केली?
अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या अश्नीर ग्रोव्हरने भारतपेच्या अलीकडील सीरीज ई फंडिंग राउंडमध्ये सामील असलेल्या इक्विटी वाटप आणि दुय्यम घटकांबद्दल सोशल मीडियावर तपशील शेअर केला होता. यानंतर, भारत पेची मूळ कंपनी रेसिलिएंट इनोव्हेशनने दिल्ली उच्च न्यायालयात ग्रोव्हरविरुद्ध एक नवीन खटला दाखल केला आणि कंपनीशी संबंधित 'गोपनीय माहिती' पोस्ट केल्याचा दावा केला.
भारत पेच्या वकिलाने 24 नोव्हेंबर रोजी न्यायालयात युक्तिवाद केला की, ग्रोव्हरच्या कृतीने त्यांच्या रोजगार करारामध्ये नमूद केलेल्या दायित्वांचे उल्लंघन केले आणि त्याने कंपनीबद्दल गोपनीय माहिती उघड केली. ही नवीन कायदेशीर कारवाई भारतपे द्वारे ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध दाखल केलेल्या चालू दिवाणी दाव्याव्यतिरिक्त आहे.