Join us  

Ashneer Grover : भारत पे प्रकरणात अश्नीर ग्रोव्हर अडचणीत? पोलिसांची कुटुंबातील सदस्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 1:47 PM

Ashneer Grover : भारत पे प्रकरणात अश्नीर ग्रोव्हरच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. अशनीर ग्रोव्हरच्या कुटुंबातील सदस्याला या प्रकरणात अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Ashneer Grover : 'शार्क टँक' या टीव्ही शो मुळे घराघरात पोहचलेले अश्नीर ग्रोव्हर तुम्हाला नक्कीच माहिती असतील. या शोमध्ये 'दोगला' हा त्यांचा डायलॉग प्रसिद्ध झाला होता. पुढे जाऊन त्यांनी या शब्दावर आधारीत 'दोगलापण' नावाचं पुस्तकही लिहिलं होतं. आता तुम्ही म्हणाल ही सर्व माहिती सांगण्याची गरज काय? सांगायचा मुद्दा हा की भारतपेचे (BharatPe) माजी संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारतपे प्रकरणी अश्नीर यांच्या एका नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. भारतपे निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. ही अटक दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली आहे.

या प्रकरणात अशनीर ग्रोव्हर यांच्या कुटुंबातील सदस्याला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार याप्रकरणी दीपक गुप्ता नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याला १९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तो अश्नीरची पत्नी माधुरी जैनच्या बहिणीचा नवरा आहे. या प्रकरणात माधुरी ग्रोव्हर हिच्यावरही अनेक आरोप लावण्यात आले आहेत. ज्यानंतर कंपनी बर्खास्त करण्यात आली होती.

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, दीपक गुप्ता यांना दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांकडून कस्टडी मागितली जाईल. त्यांना साकेत न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे.

अश्नीरच्या कुटुंबाच्या अनेक सदस्य रडारवरभारत पे कंपनीने डिसेंबर २०२२ मध्ये अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबातील ५ सदस्यांविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. अश्नीर ग्रोवरशिवाय त्याची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर , माधुरी जैनचा भाऊ श्वेतांक जैन, माधुरीचे वडील सुरेश जैन आणि दीपक गुप्ता यांच्या नावाचा समावेश आहे. या सर्व लोकांवर भारत पेमधून ८१.३० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

कुटुंबारवर गंभीर आरोपअश्नीर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करताना भारत पे ने अनेक गंभीर आरोप केले आहेत. आरोपींनी ह्यूमन रिसोर्स कन्सल्टेंटच्या नावावर बनावट देयके आणि विक्रेत्यांना अनावश्यक देयके देऊन अपहार केल्याचा आरोप केला होता. भारतपेनुसार, अनेक लोकांच्या नावे बनावट पावत्या बनवून कंपनीचे कोट्यवधी रुपयांची अफरातफर करण्यात आली.

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मे २०२३ मध्ये अश्नीर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. गेल्या महिन्यात, या प्रकरणात अमित कुमार बन्सल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती, ज्यावर २०१९ ते २०२१ या कालावधीत ७२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. आता अटकेची उष्णता अश्नीरच्या कुटुंबापर्यंत पोहोचू लागली आहे.

टॅग्स :व्यवसायगुन्हेगारी