'भारत पे'चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि 'शार्ट टँक इंडिया' शोमुळे घराघरात पोहोचलेले उद्योजक अशनीर ग्रोवर यांनी अवघ्या काही मिनिटांत कोट्यवधी रुपये कमावले आहेत. ग्रोवर यांनी गेल्या वर्षी झोमेटो लिस्टिंगच्या माध्यामातून ८ मिनिटांत २.२५ कोटी रुपये कमावले आहेत. ग्रोवर यांनी त्यांच्या 'दोगलापन' नावाच्या पुस्तकात याची माहिती दिली आहे. अशनीर ग्रोवर यांनी झोमेटोच्या आयपीओसाठी १०० कोटींच्या अर्जानं सर्वच हैराण झाले होते. इतके पैसे कसे काय जमा केले असा सवाल उपस्थित केला गेला होता, असं त्यांनी पुस्तकात नमूद केलं आहे.
पेंग्विनने प्रकाशित केलेल्या पुस्तकात ग्रोव्हर यांनी म्हटलं की, आयपीओ फायनान्सिंगचा फायदा घेत १०० कोटींची व्यवस्था केली. स्वत:च्या खिशातून पाच कोटी रुपये गुंतवले. तर कोटक वेल्थच्या मदतीने आठवड्यासाठी वार्षिक १० टक्के व्याजदरासह ९५ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा झाला होता. शेअर्स खरेदीसाठी हे व्याज म्हणून २० लाख रुपये होते.
आयपीओला तीनपेक्षा जास्त वेळा ओव्हरसबस्क्राइब केले गेले. यासह त्यांना तीन कोटी रुपयांहून अधिक किमतीचे शेअर्स मिळाले. त्यानंतर, २३ जुलै २०२१ रोजी शेअर बाजारावर ७६ रुपये प्रति शेअर या इश्यू किमतीच्या विरोधात ११५ रुपये प्रति शेअर या किमतीने शेअर्स लिस्ट झाले. ग्रोवर यांनी तातडीनं आपल्या संपत्ती व्यवस्थापकांना सर्व शेअर्स विकण्याची सूचना केली. विक्रीवेळी शेअर्सला १३६ रुपये विक्री भाव मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. व्याजानंतर लँडिंग कॉस्ट ८२ ते ८५ रुपये प्रति शेअर इतकी होती. अशाप्रकारे अवघ्या काही मिनिटांत २.२५ कोटींची कमाई झाली.
झोमेटोवर इतकी मोठी बोली का लावली?
आयआयएम अहमदाबाद आणि आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी असलेल्या ग्रोवर यांनी झोमेटोच्या आयपीओवर इतका विश्वास का ठेवला याचीही माहिती दिली. आपण झोमेटोच्या दीपेंद्रला आधीपासूनच ओळखत होतो आणि तो पुढे जाऊन काहीतरी मोठं करून दाखवेल असा पूर्ण विश्वास होता. याशिवाय, ते म्हणाले की महामारीनंतपर त्यांच्या ऑर्डरचं प्रमाण वाढलं आहे, कारण लोक आता घरी बसून कुटुंबातील तीन ते चार सदस्यांसाठी जेवणाची ऑर्डर देत आहेत. यामुळे झोमॅटोचे मार्जिन वाढले आहे. याच गोष्टींचा विचार करुन निर्णय घेतल्याचं ग्रोवर यांनी म्हटलं आहे.