Join us

अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:48 PM

Ashneer Grower BharatPe News : फिनटेक कंपनी भारतपे आणि तिचे माजी सहसंस्थापक अशनीर ग्रोव्हर यांच्यात ८८.६७ कोटी रुपयांच्या निधीच्या गैरव्यवहारप्रकरणी प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर करार झाला आहे.

Ashneer Grower BharatPe News : फिनटेक (Fintech) कंपनी भारतपे (BharatPe) आणि तिचे माजी सहसंस्थापक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांच्यात ८८.६७ कोटी रुपयांच्या निधीच्या गैरव्यवहारप्रकरणी प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर करार झाला आहे. कंपनीनं सोमवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. करारानुसार ग्रोव्हर यापुढे कोणत्याही प्रकारे कंपनीशी संबंधित राहणार नाहीत किंवा त्यांच्याकडे कंपनीचे कोणतेही शेअरहोल्डिंग असणार नाही, असं आयएएनएसला दिलेल्या निवेदनात कंपनीनं म्हटलंय.

कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, ग्रोव्हर यांचे काही शेअर्स कंपनीच्या फायद्यासाठी रेझिलियंट ग्रोथ ट्रस्टला हस्तांतरित केले जातील आणि उर्वरित शेअर्सचं व्यवस्थापन त्यांच्या फॅमिली ट्रस्टद्वारे केलं जाईल. दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही अशनीर ग्रोव्हर यांना शुभेच्छा देतो. भारतपे नफ्यासह आपली वाढ कायम ठेवत मर्चेंट्स आणि ग्राहकांना उद्योगातील अग्रगण्य सोल्यूशन्स देत राहील, असंही कंपनीनं म्हटलंय.

काय म्हणाले अशनीर ग्रोव्हर?

यानंतर अशनीर ग्रोव्हर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. "आपण भारतपे सोबत एका समझोत्यावर पोहोचलो आहोत. भारतपेचं संचालक मंडळ आणि मॅनेजमेंटवर माझा पूर्ण विश्वास आहे. कंपनीला योग्य मार्गानं पुढे नेण्यासाठी ते काम करत आहेत," असं अशनीर ग्रोव्हर म्हणाले. मी आता कोणत्याही प्रकारे भारतपेशी संबंधित राहणार नाही. यामध्ये शेअरहोल्डिंगचाही समावेश आहे. माझ्या उर्वरित शेअर्सचं फॅमिली ट्रस्टद्वारे व्यवस्थापन केलं जाईल. दोघांनीही हा खटला पुढे न नेण्याचा निर्णय घेतलाय. सर्वांनाच याचा फायदा होईल, असंही ते पुढे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

अशनीर ग्रोव्हर आणि त्याची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांना ८८.६७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवत भारतपेमधून बाहेर करण्यात आलं होतं. यानंतर कंपनीनं पैसे परत करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ग्रोव्हर यांच्या कुटुंबातील दीपक गुप्ताला अटकही केली होती. यापूर्वी अमित बन्सल यालाही ईओडब्ल्यूने अटक केली होती.

टॅग्स :व्यवसाय