फिनटेक कंपनी 'भारतपे' (BharatPe) आणि अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांच्यातील वाद अधिकच वाढलाय. राजीनाम्याची घोषणा करणाऱ्या अशनीर ग्रोव्हर यांच्यावर 'भारतपे'कडून मोठी कारवाई करण्यात आली. कंपनीने अशनीर ग्रोव्हर यांना सर्व पदांवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर कंपनीने एका पत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कंपनीच्या या निर्णयानंतरच काही वेळात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. तसंच यात आपल्याला जमिनीवरही झोपण्यात कोणती समस्या आली नसल्याचं त्यांनी म्हटलं.
कंपनीनं आपल्यावर आलिशान लाईफस्टाईल असल्याचा आरोप केला आहे. परंतु आपल्याला जमिनीवरही झोपण्यात काही समस्या नसल्याचं अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटलंय. "वास्तविक पाहता माझी लाईफस्टाईल आलिशान आहे. मला माझे मित्रही जेव्हा घरी बोलावतात, तेव्हा मला जमिनीवरही झोपण्यात काही समस्या नसते," असं त्यांनी म्हटलंय. यासोबतच त्यांनी एक फोटोही शेअर केलाय. त्यामध्ये जमिनीवर झोपण्यासाठी गादी घातल्याचं दिसून येतंय.
"हे सर्व तेव्हा आहे जेव्हा मी ३७ कोटी डॉलर्सची सीरिज ई फंडिंग मिळवण्यासाठी अमेरिका आणि युकेच्या दौऱ्यावर आहे. चांगल्या हॉटेलमध्ये राहू आणि कंपनीनं जारी केलेल्या क्रेडिट कार्डद्वारे मी ती रक्कम भरू हा माझा अधिकार आहे. ज्यांनी कधीही काही सुरूवातीपासून उभं केलं नाही, ते कधी एका संस्थापकाची मानसिकता समजू शकत नाही."
आरोपांमुळे दु:खी पण...
आपण आरोपांमुळे दु:खी आहोत पण त्याचं आश्चर्या नाही. असे आरोप वैयक्तिक द्वेषातून आणि छोट्या विचारसरणीमुळेच शक्य आहेत. माझ्यासाठी माझी स्वप्न मेहनत आणि प्रयत्नांद्वारे पूर्ण करण्याची क्षमताच लॅविश असल्याचं त्यांनी म्हटलं.