भारतपेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांना गुरुवारी जारी केलेल्या एलओसीच्या (लूक आउट सर्कुलर) आधारे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आलं. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघं न्यूयॉर्कसाठी रवाना होत होतं.
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) विनंतीवरून दोघांविरुद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. जूनच्या सुरुवातीला, आर्थिक गुन्हे शाखेनं या जोडप्याविरुद्ध आणि कुटुंबातील काही सदस्यांविरुद्ध निधीचा गैरव्यवहार केल्याबद्दल आणि भारतपे संचालित करणार्या रेझिलिएंट इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडला ८१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल एफआयआर दाखल केला होता. ज्या व्यक्तीविरुद्ध एलओसी जारी करण्यात आली आहे, तो देशाबाहेर प्रवास करू शकत नाही.
#BharatPe former CEO #AshneerGrover and his wife #MadhuriJain were halted at the #Delhi International Airport under the authority of a Lookout Circular issued against them, police said. pic.twitter.com/ujITk6RK6l
— IANS (@ians_india) November 17, 2023
तपास प्राथमिक टप्प्यात
ईओडब्ल्यूनं हा तपास अद्याप त्याच्या प्राथमिक टप्प्यात असल्याची माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशनीर ग्रोव्हर आणि माधुरी जैन यांना तपासासाठी पुढील आठवड्यात ईओडब्ल्यू समोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
भारतपे कडून तक्रार
भारतपेनं गेल्या वर्षी आर्थिक गुन्हे शाखेकडे १७ अनियमिततेच्या संदर्भात तक्रार दाखल केली होती, ज्यात घोटाळा आणि फसवणुकीच्या आरोपांचा समावेश होता. भारतपेनं नोंदवलेल्या तक्रारीनुसार, अशनीर ग्रोव्हर यांची पत्नी माधुरी जैन यांनी अशा ८ वेंडर्सना ७.६ कोटी रुपयांची पेमेंट्स दिली, ज्यांनी कंपनीत कोणत्याही कर्मचाऱ्याच्या भरतीत मदत केली नाही. याशिवाय या ८ वेंडर्सचे त्यांच्या कुटुंबीयांशी निकटचे संबंध असल्याचाही दावा त्यात करण्यात आलाय.