Join us

१ कोटी पगार असूनही अश्नीर ग्रोव्हरने सोडली पुण्यातील 'ती' कंपनी; सांगितले कसे होते ऑफिस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 3:03 PM

१ कोटी पगार असूनही अश्नीर ग्रोव्हरने पहिल्या दिवसानंतर बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनी सोडली होती.

Ashneer Grover : पुण्यातील एका खासगी कंपनीच्या चार्टर्ड अकाउंटंट मृत्यू प्रकरणाची बरीच चर्चा हो आहे. चार्टर्ड अकाउंटंच्या आईने आपल्या मुलीच्या मृत्यूचे कारण कंपनीवरील कामाचा ताण असल्याचे सांगितले आहे. २६ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटच्या आईच्या पत्रावरुन अनेकांनी आपला रोष व्यक्त केला. केंद्रानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. दुसरीकडे, भारत पेचे माजी सीईओ आणि शार्क टँक इंडियाचे माजी सदस्य अश्नीर ग्रोव्हर यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अश्नीर ग्रोव्हर यांनी १ कोटी रुपयांचे पॅकेज मिळूनही एका दिवसात ही खाजगी कंपनी का सोडली याचा खुलासा केला आहे.

बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनी अर्न्स्ट अँड यंग (EY) च्या एका तरुण कर्मचाऱ्याचा  चारच महिन्यात कामाच्या दबावामुळे मृत्यू झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे आता प्रत्येकजण कामाच्या ठिकाणी तणावाच्या चिंताजनक परिस्थितीबद्दल बोलू लागला आहे. दरम्यान, भारत पेचे माजी एमडी आणि शार्क टँक इंडियाचे सदस्य अश्नीर ग्रोव्हर यांचा २ वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो अर्न्स्ट अँड यंगमधील त्ंयाच्या पहिल्या दिवसाबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अश्नीर ग्रोव्हर टॉक्सिक वर्क कल्चरबद्दल बोलत आहेत.

हा व्हिडिओ २०२२ मधील एका सेमिनारचा आहे ज्यामध्ये अश्नीर ग्रोव्हर प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. या सेमिनारमध्ये त्यांना कोणीतरी  स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी त्यांच्या मते काय वातावरण असावे असं विचारलं होतं. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता.

"सर्वात वाईट जागा म्हणजे जिथे तुम्ही ऑफिसमध्ये प्रवेश करता आणि तिथे पूर्ण शांतता असते, तिथे तुमचे काहीही होणार नाही. ती एक मृत जागा आहे. हे माझ्या बाबतीत घडले आहे. जेव्हा मी ग्रोफर्स नंतर अर्न्स्ट अँड यंगला गेलो होतो ते म्हणाले होते की तुम्हाला एक कोटी रुपये देऊ आणि तुम्हाला भागीदार बनवू. मी म्हणालो ठीक आहे. भागीदार बनून १ कोटी रुपये मिळतात का ते पाहूया. मी त्याच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. मी एक तिथे एक फेरी मारली आणि माझ्या छातीत दुखत आहे असं मी सांगितले जेणेकरून ते मला जाऊ देतील. तिथे इतके मृत लोक आहेत. म्हणजे तिथे मृतदेह पडून आहेत, फक्त अंतिम संस्कार करायचे बाकी आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी कामासाठी भांडण होते ते सर्वोत्तम ऑफिस आहे. जिथे कुणी टॉक्सिक कल्चरआहे असे म्हणत असेल ते अगदी योग्य ऑफिस आहे,” असं अश्नीर ग्रोव्हर यांनी म्हटलं.

दरम्यान, पुण्यातील अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) कंपनीच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या २६ वर्षीय सीए अॅना सेबॅस्टियन पिरेयिल हिचा अतिकामामुळे आणि तणावामुळे बळी गेला. नोकरीला लागल्यानंतर अवघ्या चार महिन्यात अॅनाचा मृत्यू झाला. अॅना कामावर रूजू झाल्यापासून प्रंचड तणावाखाली होती. तिच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांनी कंपनीच्या भारतीय प्रमुखांना पत्र लिहित गंभीर आरोप केले होते. 

टॅग्स :पुणेनोकरीमाहिती तंत्रज्ञान