नवी दिल्ली : आशियाई विकास बँकेने (एडीबी) चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पादन वृद्धी (जीडीपी) दराचा अंदाज कमी केला असून, २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वृद्धीदर ७ टक्के राहील, असा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे.
एडीबीने गुरुवारी जारी केलेल्या अहवालानुसार विकसित देशांच्या आर्थिक वृद्धीतील मंदीमुळे व्यापारासंबंधित सेवा कारभारावर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे असले तरी जगात भारताची अर्थव्यवस्था वेगवान राहील, असेही एडीबीने म्हटले आहे.
गेले काही महिने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे चीनचा आर्थिक वृद्धीदर २०१९ मध्ये ६.३ टक्के आणि २०२० मध्ये ६.१ टक्के राहील, असा अंदाज एडीबीने ताज्या अहवालात व्यक्त केला आहे. तर आर्थिक वृद्धीच्या बाबतीत भारत चीनच्या पुढे असेल, असेही म्हटले आहे.
२०२०-२१ मध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर ७.२ टक्के राहण्याची अपेक्षा आहे. देशातील एकूणच व्यावसायिक वातावरणात सुधारणा करण्यासाठी सरकारी पातळीवर केले
गेलेले उपाय, बँकांची सध्याची मजबूत स्थिती आणि कृषी क्षेत्रातील संकटांच्या निवारणामुळे मिळालेला दिलासा, यामुळे जगात
भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे या अहवालात म्हटले आहे.
एप्रिलमध्ये भारताच्या आर्थिक वृद्धीबाबत व्यक्त केलेल्या
अंदाजापेक्षा आशियाई विकास बँकेचा या वेळचा अंदाज कमी आहे. दक्षिण आशियातील वृद्धी गतिमान राहील, हा अंदाज मात्र एडीबीआयच्या ताज्या अहवालात तसाच कायम आहे. २०१९ मध्ये दक्षिण आशियाचा वृद्धीदर ६.६ टक्के आणि २०२० मध्ये ६.७ टक्के राहील, असा अंदाज आहे. एप्रिलमध्ये एडीबीने भारताच्या आर्थिक वृद्धीदरात घट करून ७.२ टक्के केला होता. त्याआधी वृद्धीदर ७.६ टक्के राहील, असा एडीबीचा अंदाज होता.
भारताच्या आर्थिक वृद्धीदरात आशियाई विकास बँकेने केली घट
आशियाई विकास बँकेने (एडीबी) चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पादन वृद्धी (जीडीपी) दराचा अंदाज कमी केला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 04:38 AM2019-07-19T04:38:57+5:302019-07-19T04:39:17+5:30