हाँगकाँग : अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी निर्माण होण्याच्या भीतीमुळे आशियातील बाजार गुरुवारी गडगडले. भारतीय बाजारांनी मात्र या पडझडीतही तेजीची पताका फडकत ठेवली.
अमेरिकेने चीनविरुद्ध लावलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल, याची घोषणा केलेली नाही. या निर्बंधांमुळे चिडलेल्या चीनने अमेरिकेवर ‘उघड आर्थिक दहशतवादा’चा आरोप करून वातावरण आणखी तापविले आहे. प्रतिकारवाईचा इशाराही चीनने दिला आहे. जगात उत्पादित होणाऱ्या महत्त्वपूर्ण वस्तूंपैकी ९५ टक्के वस्तू चीन उत्पादित करतो. स्मार्टफोन व संगणक यापासून ते विजेच्या दिव्यांपर्यंत असंख्य वस्तूंचा त्यात समावेश आहे. अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर चीनने बंधने आणल्यास विध्वंसक परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बाजार घसरले आहेत.
टोकियो आणि शांघायचे बाजार ०.३ टक्का घसरले. हाँगकाँगचा बाजार ०.४ टक्का खाली आला. सिंगापूरचा बाजार ०.९ टक्का आणि सिडनीचा बाजार ०.७ टक्का घसरला. सेऊलचा बाजार मात्र ०.८ टक्का वर चढला. सकाळच्या सत्रात युरोपीय बाजारही घसरले होते. तथापि, नंतर त्यात सुधारणा झाली. लंडनचा बाजार ०.१ टक्क्याने, तर फ्रँकफूर्ट आणि पॅरिस येथील बाजार ०.४ टक्का वर चढले.
युरोपातील राजकीय व आर्थिक स्थितीमुळेही मंदीच्या भीतीत भर पडली आहे. युरोपीय संघाने लागू केलेल्या काटकसरीच्या नियमांना इटालीने हरताळ फासला आहे. यावरून इटालीवर युरोपीय संघाकडून ३.३ अब्ज डॉलरचे निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. हे निर्बंध इटालीच्या जीडीपीच्या ०.२ टक्क्यापर्यंत असू शकतील. त्यामुळे युरोपीय अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो, असे जाणकारांना
वाटते.
सेन्सेक्स ३३0 अंकांनी, निफ्टी ८५ अंकांनी वाढला
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार शपथ घेत असताना गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे ३३० अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुमारे ८५ अंकांनी वाढला. आदल्या सत्रात दोन्ही निर्देशांक घसरले होते.
आरआयएल, एचडीएफसी आणि टीसीएस या बड्या कंपन्यांनी तेजीचे नेतृत्व केले. तथापि, टक्केवारीच्या दृष्टीने एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक ३.४४ टक्क्यांनी वाढले. त्याखालोखाल भारती एअरटेल, बजाज फायनान्स, टीसीएस, येस बँक, एचडीएफसी, एसबीआय आणि रिलायन्स यांचे समभाग २.३३ टक्क्यांपर्यंत वाढले. सन फार्मा, एम अँड एम, इंडसइंड बँक, वेदांता आणि ओएनजीसी यांचे समभाग २.३९ टक्क्यांपर्यंत घसरले.