Join us

आशिया खंडातील हवाई प्रवाशांच्या संख्येत २.७ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 6:46 AM

आशिया पॅसिफिक विभागातील हवाई प्रवाशांच्या संख्येत २.७ टक्क्यांची वाढ झाली असून मध्य पूर्वेत २.५ टक्क्यांची वाढ झाली असल्याची आकडेवारी एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल या संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे.

मुंबई : आशिया पॅसिफिक विभागातील हवाई प्रवाशांच्या संख्येत २.७ टक्क्यांची वाढ झाली असून मध्य पूर्वेत २.५ टक्क्यांची वाढ झाली असल्याची आकडेवारी एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल या संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यातील हवाई वाहतुकीचा अभ्यास केल्यानंतर हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. एकीकडे हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असताना हवाई मालवाहतुकीमध्ये मात्र लक्षणीय घट झाली आहे.भारतातील हवाई प्रवाशांच्या संख्येत २.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत मात्र घसरण झाली आहे. मुंबई विमानतळाची धावपट्टी दुरुस्तीसाठी बंद असल्याने, पाकिस्तानी हवाई हद्द भारतीयविमानांसाठी बंद केल्याचा फटका व प्रमुख विमान कंपन्यांच्या सेवा काही प्रमाणात रद्द झाल्याचा एकत्रित फटका याला बसला आहे. मुंबई विमानतळावरील प्रवासी वाहतुकीत ७.७ टक्क्यांची घट झाली आहे तर दिल्ली विमानतळावरील प्रवासी संख्येत ३ टक्के घट झाली आहे. मात्र, बेंगळुरू विमानतळावरील प्रवासी संख्येत ८.९ टक्के, चेन्नई विमानतळावरील प्रवासी संख्येत ५.५ तर कोलकाता विमानतळावरील प्रवासी संख्येत ३.९ टक्क्यांची वाढ झाली आहे.हवाई मार्गे होणाऱ्या मालवाहतुकीमध्ये गतवर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत आशिया पॅसिफिक विभागात १२ टक्क्यांची घट झाली आहे; तर मध्य पूर्वेमध्ये २.९ टक्क्यांची घट झाली आहे. चीन व अमेरिकेमधील व्यापारामधील तणावाचा परिणाम मालवाहतुकीवर झाल्याची शक्यता आहे. मुंबईतील मालवाहतुकीमध्ये १ टक्का वाढ झाली असून दिल्लीमध्ये १०.२ टक्के वाढ झाली आहे.

टॅग्स :विमानभारत