चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या रिअल इस्टेटच्या संकटाचा परिणाम तेथील सामान्य जनता आणि व्यावसायिक तसेच श्रीमंत लोकांवर होत आहे. यामुळे गेल्या वर्षभरात आशियातील सर्वात श्रीमंत महिलेच्या संपत्तीत 50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, चीनमधील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी कंट्री गार्डनच्या मालक आणि आशियातील सर्वात श्रीमंत महिला यांग हुइयान यांची संपत्ती 52 टक्क्यांनी घटून 11.3 अब्ज डॉलरवर आली आहे, जी एका वर्षापूर्वी 23.7 अब्ज डॉलर होती.
यांग हुइयान यांच्या संपत्तीत घट होण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत झालेली घसरण. चीनच्या रिअल इस्टेटच्या संकटामुळे बुधवारी त्यांच्या कंपनीचा शेअर 15 टक्क्यांनी घसरला होता. कंट्री गार्डनची सुरुवात यांग हुइयान यांचे वडील यांग गुओकियांग यांनी केली होती, त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी कंपनीचे सर्व शेअर्स त्यांच्या मुलीकडे सुपूर्द केले आणि तेव्हापासून यांग हुइयान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आहेत. यांग हुइयान यांच्यावर आशियातील सर्वात श्रीमंत महिलेचा किताब हिरावण्याचा धोका आहे. चिनी रसायन उद्योगपती फॅन होंगवेई यांची संपत्ती आता 11.2 अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळे असे म्हटले जात आहे.
दरम्यान, चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्राला सध्या जास्त कर्जामुळे तरलतेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. चीनमधील अनेक प्रांतांमध्ये बिल्डर्स शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाल्याच्या बदल्यात घरे विकत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्थिक संकटामुळे देशभरात घरांच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे आणि अनेक प्रांतांमध्ये असे दिसून येते की, लोक गहाण ठेवून घेतलेले कर्ज फेडत नाहीत. कारण त्यांच्या घरांची किंमत त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या कर्जाच्या तुलनेत खूप कमी झाले आहे.