गुवाहटी : एक किलो चहाची विक्री 99,999 रुपयांना करण्यात आली आहे. तुम्ही विचार करत असाल की, हा कोणता चहा आहे, जो इतका महाग विकला आहे. खरंतर, गुवाहाटी टी ऑक्शन सेंटर (GATC) येथे मंगळवारी एक किलो गोल्डन बटरफ्लाय चहा (Golden Butterfly Tea) विक्रमी 99,999 रुपयांना विकला गेला. या चहाचे ब्रँडिंग 'मनोहरी गोल्ड' (Manohari Gold Tea) असे केले जाते.
'मनोहरी गोल्ड टी'ने मंगळवारी गुवाहाटी चहाच्या लिलावात स्वतःचाच विक्रम मोडून इतिहास रचला. गेल्या वर्षी या चहाची एक किलो 75 हजार रुपयांना विक्री झाली होती. डिब्रुगड जिल्ह्यातील हा चहा गुवाहाटी येथील घाऊक व्यापारी सौरभ टी ट्रेडर्सने विकत घेतला होता. या एका किलोची विक्रमी 99,999 रुपयांची बोली लावली.
दरम्यान, आसामच्या डिब्रुगड जिल्ह्यात 'मनोहरी गोल्ड' चहा तयार केला जातो. GATC च्या मते, भारतात लिलाव होणारी चहाची ही सर्वोच्च किंमत आहे. गुवाहाटी टी ऑक्शन बायर्स असोसिएशनचे सचिव दिनेश बिहाणी यांनी आज तक/इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, लिलावात 'मनोहरी गोल्ड टी' 99,999 रुपये प्रति किलो दराने विकला गेला आहे. हा चहाचा दुर्मीळ प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.
'मनोहरी गोल्ड चहा'चे खरेदीदार सौरभ टी ट्रेडर्सचे सीईओ एमएल माहेश्वरी यांनी सांगितले की, 'मनोहरी गोल्ड' चहाची मागणी खूप जास्त आहे आणि त्याचे उत्पादन खूपच कमी आहे. 'मनोहरी टी' इस्टेटतर्फे यंदा केवळ एक किलो चहाचा लिलाव झाला. हा चहा घेण्यासाठी आम्ही बरेच दिवस प्रयत्न करत होतो. बागेच्या मालकाने वैयक्तिकरित्या आम्हाला ते विकण्यास नकार दिला होता, त्यानंतर आम्ही या लिलावादरम्यान ते खरेदी करण्यास यशस्वी झालो, असे केले, असे ते म्हणाले.
2018 मध्ये याच ब्रँडचा एक किलो चहा 39,000 रुपयांना विकला गेला होता. हा देखील सौरभ टी ट्रेडर्सने खरेदी केली होता. एका वर्षानंतर, त्याच कंपनीने तोच एक किलो चहा 50,000 रुपयांना विकत घेतला. मात्र गेल्या वर्षी एक किलोचा भाव 75 हजार रुपये होता, तो विष्णू टी कंपनीने विकत घेतला होता.