Join us

Success Story : दानशूर! कर्मचाऱ्यांमध्ये वाटली ₹६००० कोटींची संपत्ती, स्वत:कडे मोबाइलही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 11:11 AM

त्यांनी आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कंपनीच्या मॅनेजमेंट टीम किंवा लीडरशीप पोझिशनवर स्थान दिलं नाही.

उद्योगपती, व्यावसायिक अनेकदा काही ना काही दान करत असतात हे आण ऐकलं असेल. कोणी सामाजिक कार्यासाठी देणगी देतात, तर कोणी नैसर्गिक आपत्तीत, पण आज आम्ही तुम्हाला ज्या उद्योगपतीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपली संपूर्ण संपत्ती आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दान केली. श्रीराम ग्रुपचे संस्थापक आर त्यागराजन यांनी त्यांची सर्व संपत्ती त्यांच्या कर्मचाऱ्यांना दान केली. आज जाणून घेऊया या दानशूर व्यावसायिकाची कहाणी.

कोण आहेत आर त्यागराज?श्रीराम ग्रुपचे संस्थापक आर त्यागराजन यांचा जन्म तामिळनाडूमधील शेतकरी कुटुंबात झाला. गणितात पदवी घेतल्यानंतर त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता येथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. १९६१ मध्ये ते न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत रुजू झाले. काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. १९७४ मध्ये त्यांनी दोन मित्रांसह श्रीराम ग्रुप सुरू केला. कंपनीने चिट फंड व्यवसाय म्हणून सुरुवात केली, परंतु नंतर त्यांनी कर्ज आणि विमा या दिशेनं त्यांचा व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली.

दान केली संपत्तीब्लूमबर्गला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ८६ वर्षीय त्यागराजन यांनी आपण ७५० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ६ हजार कोटी रुपयांची संपत्ती दान केल्याचं सांगितलं. एक छोटंसं घर आणि गाडी सोडून त्यांनी आपली सर्व संपत्ती कर्मचाऱ्यांना दान केली. ते म्हणाले की मी माझा संपूर्ण हिस्सा कर्मचाऱ्यांच्या एका ग्रुपला दिला आहे. ज्या लोकांच्या जीवनात अडचणी आहेत त्यांच्या जीवनात मला आनंद आणायचाय. मला पैशांची गरज नाही. ती आधीही नव्हती आणि आताही नाही, असं त्यागराज म्हणतात. आपला बहुतांश वेळ ते संगीत ऐकण्यात आणि परदेशी बिझनेस मॅगझिन वाचण्यात घालवतात.

लाखो लोकांना रोजगारभारतातील आघाडीच्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीपैकी एक श्रीराम ग्रुप भारतातील लोकांना वाहन कर्जही देते. गरजू लोकांनाही कर्ज देते. कर्जाव्यतिरिक्त विम्याचीही सुविधा पुरवली जाते. कंपनीनं आतापर्यंत १,०८,००० लोकांना रोजगार दिला आहे. मार्केटच्या तुलनेत मी माझ्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी ठेवला आहे. ज्यात ते खूश राहू शकतील इतकं आम्ही त्यांना दिलं. कंपनीच्या या व्यवस्थेमुळे आमचे कर्मचारी खूश असल्याचं त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.

मोबाइल ठेवत नाहीतमुलाखतीत त्यांनी सांगितले की, मला लोकांशी जोडलं जाणं आवडतं, त्यामुळे मी माझ्यासोबत मोबाईल फोन ठेवत नाही. त्यांनी वर्षानुवर्षे हॅचबॅक कार चालवली. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या कुटुंबाला व्यवसायापासून वेगळंही ठेवलं. त्यांनी आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कंपनीच्या मॅनेजमेंट टीम किंवा लीडरशीप पोझिशनवर स्थान दिलं नाही. त्यांचा मुलगा टी शिवरामन इंजिनिअर आहे. त्यांचा धाकटा मुलगा सीए असून ते श्रीराम ग्रुपमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात. कंपनीच्या नफ्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या कंपनीनं आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत १६७५ कोटींचा नफा कमावला.

टॅग्स :व्यवसाय