कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच देशांना बसला आहे. तर दुसरीकडे चीनही यातून सुटलेला नाही. २०२२ या वर्षात चीनचीअर्थव्यवस्था ३ टक्क्यांवर होती. चीनचा हा विकासदर ४० वर्षांतील सर्वात कमकुवत राहिला आहे. अशाच परिस्थितीत भारत आता चीनची जागा घेऊ शकतो असं म्हटलं जातंय. परंतु रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मात्र वेगळंच चित्र समोर आणलंय. चीनची जागा घेण्याची गोष्ट सध्या करणं आता योग्य ठरणार नाही. परंतु भविष्यात स्थिती बदलू शकते, असं रघुराम राजन यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना म्हटलं.
“भारत ग्लोबल लीडर म्हणून पुढे येतोय यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. अनेक विदेशी कंपन्या भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत. परतु ज्याप्रकारे चीनची जागा भारत घेईल असं म्हटलं जातंय, हे बोलणं थोडं घाईचं ठरेल,” असं राजन म्हणाले. यासंदर्भात त्यांनी अनेक उदाहरणं दिली. “चीन आपल्या झिरो कोविड पॉलिसीमुळे कठीण परिस्थितीतून जात होता. परंतु आता सुधारणा सुरू आहेत. चीनमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, परंतु मार्च एप्रिलपर्यंत यात सुधारणा दिसून येईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
परिस्थिती बदलू शकते“भारत चीनची जागा घेईल हा विचार करणं घाईचं ठरेल. भारताची अर्थव्यवस्था चीनच्या तुलनेत छोटी आहे. चीनपर्यंत पोहोचायला आता वेळ लागेल. परंतु वेळेनुसार परिस्थिती बदलेल,” असं राजन म्हणाले.
“भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. यात विकासाची गती सुरू आहे. सुधारणा याच प्रकारे सुरू राहिल्या तर येणाऱ्या दिवसांत स्थिती बदलू शकते. सध्या आपलं लक्ष श्रम बाजारासह हाऊसिंग सेक्टरवही आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी यावेळी जागतिक मंदीचीही शक्यता व्यक्त केली.