यंदाच्या वर्षात सोन्याच्या दरांममध्ये विक्रमी वाढ झाली आहे. आता सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरांनी प्रति दहा ग्रॅममागे एक लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. मात्र एकेकाळी सोन्याचे दर १०० रुपयांपेक्षा कमी होते, असं सांगितल्यास कुणाचा विश्वासही बसणार नाही. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सोनं प्रति तोळा ८८ रुपये एवढेच होते. मात्र नंतर हळुहळू हे दर वाढून एक लाखांच्या पुढे पोहोचले आहेत.
सोन्यामधील दीर्घकालीन गुंतवणुकीने लोकांना खूप नफा मिळवून दिला आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा सलग १७ वर्षे सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने घत होत होती. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे लोक कमालीचे त्रस्त झाले होते. या १७ वर्षांमध्ये सोन्याची किंमत सातत्याने घटून ६३ रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर हे दर वाढून पूर्वस्थितीत येण्यास आणखी चार वर्षे लागली होती.
भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा १० ग्रॅम सोन्याचा दर हा ८८.६२ रुपये एवढा होता. मात्र नंतर स्टॉक मार्केटपासून जागतिक राजकारणापर्यंत सगळीकडे स्थैर्य आलं. त्यामुळे सोन्याचे दर घटू लागले. तसेच डॉलर मजबूत होऊ लागला. त्यामुळे सुमारे १७ वर्षांपर्यंत सोन्याच्या दरात चढउतार सुरू राहिले. अखेरीस १७ वर्षांनंतर १९६४ मध्ये सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅममागे ६३.२५ रुपयांपर्यंत खाली आले. नंतर चार वर्षांनी १९६७ मध्ये सोन्याचे दर प्रति तोळा १०० रुपयांच्या पुढे गेले.
दरम्यान, मागच्या पाच वर्षांपासून सोन्याच्या दरांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. २०२० पासून आजपर्यंतचा आढावा घेतल्यास अवघ्या पाच वर्षांत सोन्याची किंमत दुप्पट झाली आहे. २०२० मध्ये १० ग्रॅम सोन्याचा दर हा ५० हजार १५१ रुपये एवढा होता. तर यावर्षी एप्रिल महिन्यात हाच दर एक लाख रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. यादरम्यान, मार्च २०२३ मध्ये सोन्याच्या दरांनी ६० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. तर एप्रिल २०२४ मध्ये सोन्याचे दर ७० हजार रुपयांच्या वर पोहोचले होते. तर यावर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ दिसून येत आहे.