निवृत्तीनंतर आपली आर्थिक गरज कशी पूर्ण होणार? असा प्रश्न जर तुमच्यासमोर उपस्थित झाला असेल तर केंद्र सरकारची एक खास योजना आहे. यातून तुमच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजेचा प्रश्न सुटू शकतो. केंद्र सरकारनं सुरू केलेली अटल पेन्शन योजना (APY) सर्वसामान्य नोकरदार वर्गासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. या योजनेत तुम्ही अतिशय कमी गुंतवणुकीनं सुरुवात करू शकता. त्याच्या मोबदल्यात तुम्हाला ठराविक कालावधीनंतर दरमहा पेन्शन स्वरुपात रक्कम मिळू शकते. यात सरकार देखील तुमच्या खात्यात योगदान देतं. (Atal Pension Scheme: invest rs 7 daily and get up to 60000 pension, know details)
आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अटल पेन्शन योजना अतिशय चांगली योजना आहे. या योजेनेअंतर्गत तुम्ही दरमहा ५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम पेन्शन स्वरुपात मिळवू शकता. यासाठी तुम्हाला या योजनेत २० वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचं वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे.
योजनेचे फायदे कोणते?अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला ऑटो डेबिट सुविधा मिळते. यात दरमहा, तीन महिन्यांनी किंवा मग दर सहा महिन्यांनी तुम्ही ठराविक रक्कम जमा करू शकता. योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास गुंतवणूक केलेली रक्कम नॉमिनीला पेन्शन स्वरुपात मिळते. या योजनेचा असंघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो. अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
कसे मिळतील ६० हजार रुपये?अटल पेन्शन योजनेत तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या रकमेनुसार त्याचा लाभ किंवा पेन्शन तुम्हाला मिळते. एखाद्या व्यक्तीनं वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि दरमहा ४२ रुपये गुंतवले तर अशा व्यक्तीला दरमहा १ हजार रुपये पेन्शन स्वरुपात मिळू शकतात. याचपद्धतीनं दरमहा ८४ रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना दरमहा २ हजार रुपयांची पेन्शन मिळवता येऊ शकते. तसंच दरमहा ५ हजार रुपये म्हणजेच वार्षिक ६० हजार रुपये पेन्शन प्राप्त करण्यासाठी गुंतवणूकदाराला दररोज ७ रुपये किंवा दरमहा २१० रुपये जमा करावे लागतील.