नवी दिल्ली : जर तुम्हाला भविष्यात आर्थिक बळकटी द्यायची असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करू शकता. थोडीशी बचत आणि गुंतवणूक तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मोठा आधार देईल. त्यामुळे वृद्धावस्था सुरक्षित करण्यासाठी कोट्यावधी लोकांनी केंद्र सरकारची ‘अटल पेन्शन योजना’ निवडली आहे. योजनेत सामील होणाऱ्या ग्राहकांची संख्या लवकरच अडीच कोटींचा टप्पा ओलांडणार आहे.
अटल पेन्शन योजनेंतर्गत सरकार असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी दरमहा पेन्शनची व्यवस्था करते. गरीब आणि श्रमिक वर्गातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळेच वृद्धावस्था सुरक्षित करण्यासाठी कोट्यावधी लोक या योजनेची निवड करीत आहेत. या योजनेत सुमारे 2.45 कोटी भागधारकांचा समावेश आहे.
फक्त 42 रुपयांपासून करा गुंतवणूक
यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटी भागधारकांच्या संख्येत 34.51 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या योजनेत फक्त 42 रुपये दरमहा भरून तुम्हाला आजीवन पेन्शनचा लाभ मिळू शकेल. यासाठी तुम्हाला 18 वर्षे या योजनेत सामील व्हावे लागेल. यानंतर, दरमहा 42 रुपये भरल्यानंतर वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर तुम्हाला 1 हजार रुपये पेन्शन मिळेल. त्याचबरोबर जर तुम्ही दर महिन्याला 210 रुपये जमा केले तर तुम्हाला महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मिळेल.
अटल पेन्शन योजनेचे उद्दिष्ट्य म्हणजे वृद्धावस्थेत उत्पन्नाची सुरक्षा प्रदान करणे. यामध्ये वयाच्या 60 वर्षांनंतर किमान पेन्शनची हमी दिली जाते. देशातील कोणताही नागरिक वयाच्या 18 ते 40 वर्षांच्या कालावधीत या योजनेचा लाभ घेऊ शकतो. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे भागधारकाचा मृत्यू झाल्यानंतर पेन्शन त्याच्या जोडीदारास दिली जाते. एवढेच नाही तर दोघांच्या मृत्यूनंतर पेन्शन फंडामध्ये जमा केलेली रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाते.
इंटरनेट बँकिंगशिवाय उघडू शकता खाते
लवकरच बचत खाते धारकांना इंटरनेट बँकिंगशिवाय अटल पेन्शन योजनेद्वारे खाते उघडता येणार आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण(PFRDA), APY-POPs ला आपल्या सध्याच्या बचत खातेदारांना ऑनलाइन अटल पेन्शन योजना खाते उघडण्यासाठी पर्यायी स्वरूपाने परवानगी देत आहे. नवीन माध्यमांतर्गत एखादी व्यक्ती इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल अॅप वापरल्याशिवाय अटल पेन्शन योजना खाते उघडता येऊ शकते.
काय आहे नवीन पद्धत?
अटल पेन्शन योजनेत नेट बँकिंगशिवाय खाते उघडण्यासाठी पीएफआरडीएने बँकांचे वेब पोर्टल वापरण्याचा पर्याय आणला आहे. बँक खातेदारांना अटल पेन्शन योजनेत खाते ऑनलाइन उघडण्यासाठी सुविधा पुरवणाऱ्या बँकांच्या पोर्टलला भेट द्यावी लागेल. यानंतर त्यांना ग्राहक आयडी किंवा बचत खाते क्रमांक (कोणतेही दोन) किंवा पॅन किंवा आधार देऊन नोंदणी करावी लागेल. ओटीपी आधारित ऑथेंटिकेशनद्वारे रजिस्ट्रेनशन पूर्ण केले जाईल.