नवी दिल्ली - गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली. निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) अटल पेन्शन योजने अंतर्गत (APY) वय वाढवण्याची शिफारस केली आहे. सध्या अटल पेन्शन योजनेत सरकार दरमहा 1000 ते 5000 रुपयांच्या पेन्शनची हमी देते आणि 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकते.
वर्षाला 60,000 रुपये पेन्शन
सरकारने वय वाढविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास त्याचा फायदा घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. अटल पेन्शन योजनेंतर्गत, दरमहा खात्यात निश्चित रक्कम भरल्यावर सेवानिवृत्तीनंतर 1000 ते 5000 पर्यंत महिन्याला पेन्शन मिळेल. तसेच 6 महिन्यांमध्ये 1239 रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर सरकार आजीवन 5000 रुपये महिन्याला किंवा वर्षाला 60,000 रुपये पेन्शन देण्याची हमी देत आहे.
महिन्याला 210 रुपये भरा
पेन्शन योजनेच्या सध्याच्या नियमांनुसार वयाच्या 18 व्या वर्षी मासिक पेन्शनअंतर्गत जास्तीत जास्त 5 हजार रुपयांसाठी व्यक्तीला दरमहा 210 रुपये द्यावे लागतील. जर दर तीन महिन्यांनी पैसे भरायचे असल्यास 626 रुपये द्यावे लागतील आणि सहा महिन्यांसाठी 1,239 रुपये द्यावे लागतील. तसेच जर 1000 रुपये मासिक पेन्शन हवे असल्यास 42 रुपये महिन्याला भरावे लागतील.
वयाच्या 35 व्या वर्षी 5 हजार पेन्शनसाठी सामील होत असाल तर दर 6 महिन्यांसाठी 25 वर्षांसाठी 5,323 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर एकूण गुंतवणूक 2.66 लाख असेल. ज्यावर महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मिळेल. वयाच्या 18 व्या वर्षी सामील झाल्यास एकूण गुंतवणूक केवळ 1.04 लाख रुपये असेल. म्हणजेच एका पेन्शनसाठी जवळपास 1.60 लाख रुपये जास्तीचे गुंतवावे लागतील.
खूशखबर... PF वर अधिक व्याजाची 'दिवाळी भेट', 6 कोटी नोकरदारांना फायदा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांना सरकारने खूशखबर दिली. 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये पीएफवर 8.65 टक्के व्याज देण्याची घोषणा कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. याचा फायदा सुमारे सहा कोटींहून अधिक नोकरदारांना होणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने गेल्या आर्थिक वर्षासाठी यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 8.65 टक्के व्याज देण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आले होते. कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की, ''येणाऱ्या उत्सव काळापूर्वी ईपीएफओ सहा कोटी पेक्षा अधिक सदस्यांना 2018-19 या आर्थिक वर्षासाठी एकूण ठेवींवर 8.65 टक्के व्याज मिळेल. 2017-18 या आर्थिक वर्षांत पीएफवरील व्याजदर 8.55 टक्के एवढा होता.