नवी दिल्ली-
अटल पेन्शन योजना सरकारकडून चालवण्यात येणारी गॅरंटेड पेन्शन योजना आहे. या योजनेतील सदस्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात अटल पेन्शन योजनेत सहभागी होणाऱ्या सदस्यांचा आकडा आता १.१९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर नॅशनल पेन्शन स्कीम आणि अटल पेन्शन योजनेतील एकूण सदस्य संख्या १.३५ कोटीहून अधिक झाली आहे.
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानं (PFRDA) ६ एप्रिल रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार गेल्या आर्थिक वर्षात अटल पेन्शन योजनेअंतर्गत एकूण ग्राहकांची संख्या १.१९ कोटी इतकीहोती. तर राष्ट्रीय पेन्शन योजनेतील सदस्य संख्येचा आकडा ८.४७ लाख इतका होता. एनपीएसची नावनोंदणी जवळपास १.५४ लाख इतकी होती. तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार अंतर्गत अनुक्रमे १.२८ लाख, ५.३५ लाख इतकी होती. सरकारच्या या दोन्ही पेन्शन योजनांशी निगडीत सदस्य संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अटल पेन्शन योजना सरकारच्या निवडक बचत योजनांमध्ये सर्वात लोकप्रिय आणि अव्वल स्थानावर आहे.
५ हजार रुपयांपर्यंत पेन्शनची गॅरंटी
तुम्हीही जर तुमच्या उतार वयात आर्थिक पातळीवर सक्षम राहण्याचा विचार करत असाल तर अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात करा. अटल पेन्शन योजना सरकारची जबरदस्त योजना आहे. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करता तर तुम्हाला मिळणारं पेन्शन नक्कीच मिळणार याची हमी आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी १०००, २०००, ३०००, ४००० आणि जास्तीत जास्त ५ हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. उतार वयात पेन्शन सर्वात मोठं सहाय्य ठरतं. जर दरमहा एक छोटी रक्कम जमा करुन तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता.