Join us  

आता तुम्ही स्वस्तात विमानाने प्रवास करू शकणार? सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 6:31 PM

ATF Price Cut : एटीएफमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी कपात आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत तुम्हाला स्वस्त विमान प्रवासाची संधी मिळू शकते, अशी शक्यता आहे.

नवी दिल्ली : विमान प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच सरकारकडून मोठी खुशखबर मिळू शकते. दरम्यान, सोमवारी देशात विमान इंधन म्हणजेच एटीएफच्या (Aviation Turbine Fuel) किमतीत 12 टक्क्यांनी मोठी कपात झाली. एटीएफमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी कपात आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत तुम्हाला स्वस्त विमान प्रवासाची संधी मिळू शकते, अशी शक्यता आहे. विमान कंपन्या भाडे कमी करण्याबाबत कोणतीही घोषणा करू शकतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे ही कपात झाली आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढीमुळे एटीएफच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. यानंतर, वित्त मंत्रालयाने (Finance Ministry) आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांनाही तेल विपणन कंपन्यांकडून विमान इंधन म्हणजेच एटीएफ (Aviation Turbine Fuel) खरेदीवर 11 टक्के मूलभूत उत्पादन शुल्कातून (बेसिक एक्साइज ड्यूटी) दिलासा दिला होता.

दरम्यान,  दिल्लीत एटीएफच्या किंमतीत 16,232.36 रुपये प्रति किलोलीटर किंवा 11.75 टक्क्यांनी मोठी कपात करण्यात आली आहे. याची किंमत 121,915.57 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. आता एटीएफमध्ये कपात केल्यानंतर विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो, अशी अपेक्षा प्रवाशांना वाटत आहे. म्हणजेच आता विमान कंपन्या भाडे कमी करण्याचा विचार करू शकतात.

आधी 2.2 टक्के झाली होती कपातयापूर्वी 16 जुलै रोजी 3,084.94 रुपये प्रति किलोलिटर (2.2 टक्के) ची कपात झाली होती आणि यावेळी ही कपात आतापर्यंतची सर्वात मोठी आहे. दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडरही स्वस्त झाले आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 36 रुपयांनी कमी होऊन 1,976.50 रुपये झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय राजधानीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1,053 रुपये आहे.

टॅग्स :विमानव्यवसाय