नवी दिल्ली : तुम्हीही अनेकदा विमानाने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आगामी काळात विमान तिकिटांच्या किमती वाढू शकतात. दरम्यान, नोव्हेंबर महिना सुरू होताच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराने झटका दिल्यानंतर, आता एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) बाबत देखील एक अपडेट समोर आली आहे. तेल कंपन्यांनी एटीएफच्या दरात मोठी वाढ केली आहे. याचा परिणाम आगामी काळात तिकीट दरावर होण्याची शक्यता आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOCL) मंगळवारी सकाळी जारी केलेल्या किमतीत 4842.37 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत ही किंमत 120,362.64 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. याशिवाय, कोलकात्यात प्रति किलोलीटर 127,023.83 रुपये, मुंबईत 119,266.36 रुपये आणि चेन्नईमध्ये 124,998.48 रुपये प्रति किलोलीटर किंमत पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाइन्सच्या एकूण खर्चापैकी सुमारे 40 टक्के एटीएफचा वाटा आहे. यामध्ये वेग वाढल्याने विमान कंपन्यांचा खर्च वाढतो. दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांकडून थोडासा दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करत हा दिलासा दिला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 115 रूपयांची कपात करण्यात आली आहे.
मेट्रो शहरातील आजचे ATF चे दर
दिल्ली - 120,362.64 रुपये प्रति किलोलिटर
कोलकाता - 127,023.83 रुपये प्रति किलोलिटर
मुंबई - 119,266.36 रुपये प्रति किलोलिटर
चेन्नई - 124,998.48 रुपये प्रति किलोलिटर