Banking Sector News:सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना एटीएम सेवेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांबद्दल केंद्र सरकारने संसदेत महत्त्वाची माहिती दिली. लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ मंत्रालयाने याबद्दल आकडेवारी जाहीर केली. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने जवळपास २ हजार कोटी रुपये उत्पन्न कमावले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मागील पाच आर्थिक वर्षांमध्ये एटीएमच्या माध्यमातून बँकांनी किती पैसे कमावले याबद्दल सरकारने माहिती दिली आहे. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार एटीएम सेवेतून फायदा होणाऱ्या बँकांची संख्या खूपच कमी आहे. मात्र, एसबीआयला मात्र भरपूर पैसे मिळाले आहेत.
कोणत्या बँकांना एटीएम सेवेत फायद्यात?
रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षांच्या काळात वेगवेगळ्या सार्वजनिक बँकांनी वेगवेगळ्या स्वरुपात उत्पन्न मिळवले आहे. तर काही बँकांना तोटा सहन करावा लागला आहे. कमाई करणाऱ्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेचा समावेश आहे.
आकडेवारीवर नजर टाकायची झाल्यास २०१९-२० मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने ६५६ कोटी रुपये एटीएम सेवेतून कमावले. तर पंजाब नॅशनल बँकेने १०२.४० कोटी रुपये. दुसरीकडे बँक ऑफ बडोदा बँकेला ७०.०६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बँक ऑफ इंडियालाही २१२.०८ कोटींचा तोटा झाला आहे.
इंडियन बँकेला २०१९-२० या काळात ४१.८५ कोटींचे नुकसान झाले आहे. २०२३-२४ मध्ये ते आणखी वाढून १८८.७५ कोटी रुपयांवर गेले. सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही २०१९-२० मध्ये ६०.२६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर २०२३-२४ मध्ये ते १९५.८८ कोटींवर पोहोचले.