ट्रायनं ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून नियमांमध्ये बदल केले आहेत. आता पुन्हा एकदा सिम कार्डशी संबंधित नियम बदलणार आहेत. मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिम स्वॅप फ्रॉड टाळण्यासाठी ट्रायनं हा नियम लागू केलाय.
काय होणार बदल?
सिम कार्ड चोरी झाल्यास किंवा नुकसान झाल्यास थोडी वाट पाहावी लागणार आहे. पूर्वी सिमकार्ड चोरीला गेल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर दुकानातून लगेच सिमकार्ड मिळत होतं. पण आता त्याचा लॉकिंग कालावधी वाढवण्यात आला आहे. आता युजर्सला ७ दिवस वाट पाहावी लागणार आहे, त्यानंतरच युजर्सला नवीन सिमकार्ड मिळेल. म्हणजेच सात दिवसानंतरच तुम्हाला हे सिम कार्ड मिळेल जे एमएनपी नियमांत बदलांनंतर लागू करण्यात आलंय.
का घेतलाय निर्णय?
वास्तविक हा निर्णय ट्रायनं (TRAI) घेतला होता. फसवणुकीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. सिम कार्ड चोरीला गेल्यानंतर दुसऱ्या सिम कार्डवर नंबर अॅक्टिव्हेट केल्याची अनेक प्रकरणं मध्यंतरी समोर आली होती. आता अशा ऑनलाइन घोटाळ्यासारख्या घटनांना आळा घालण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय. ट्रायन मार्चमध्ये याबाबत अधिसूचना जारी केली होती.
सिम स्वॅपिंग म्हणजे काय?
सिम स्वॅपिंग म्हणजे तोच नंबर दुसऱ्या सिमकार्डवर अॅक्टिव्हेट करणं. एकच नंबर दुसऱ्या सिम कार्डावर अॅक्टिव्हेट केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. अशा घटना टाळण्यासाठी सिम स्वॅपिंगची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.