नवी दिल्ली: आताच्या घडीला बँकिंग क्षेत्रातील सार्वजनिक तसेच खासगी बँका नफ्यात असल्याचे दिसत आहेत. कोरोना संकट काळात अनेक बँकांच्या फायद्यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच एका बँकेने पाच वर्षांच्या यशस्वी व्यवसायाबाबत गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. नुकतीच बँकेने आर्थिक आकडेवारी जाहीर केली असून, गुंतवणूकदारांना बोनस शेअर आणि लाभांश दिला जाणार आहे.
खासगी क्षेत्रातील एयु स्मॉल फायनान्स बँकेने व्यवसायाची पाच वर्ष पूर्ण केल्याबद्दल समभागधारकांना बोनस शेअरची घोषणा केली आहे. एयु बँकेच्या कामगिरीत वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. बँकेच्या ठेवींमध्ये वार्षिक ४६ टक्क्यांनी वाढून ५२ हजार ५८५ कोटी झाल्या आहेत, सीएएसए गुणोत्तरामध्ये आणखी सुधारणा होऊन ती २३ टक्क्यांच्या तुलनेत ३७ टक्के झाली. आर्थिक वर्ष २२ च्या तिमाहीत, साल-दरसाल निधी-आधारित वाटप ३९ टक्क्यांनी वाढून १० हजार २९५ कोटींची नोंद झाली.
आगाऊ रकमेत ३२ टक्के वृद्धी झाली
बँकेच्या एकूण आगाऊ रकमेत ३२ टक्के वृद्धी झाली असून हा आकडा ४६ हजार ७८९ कोटींपर्यंत वाढला आहे. तिमाहातील प्रत्येक महिन्यात सातत्याने १०० टक्क्यांपेक्षा जास्त संकलन क्षमतेची जोड त्याला मिळाली. परिणामी, मालमत्तेच्या गुणोत्तरात सातत्याने सुधारणी झाली. आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीकरिता निधी-एतर वाटप साल-दरसाल ९० टक्क्यांवर जात ७४२ कोटीएवढे नोंदवले गेले आहे.
दरम्यान, स्मॉल फायनान्स बँक म्हणून गेल्या पाच वर्षात मिळवलेले यश साजरे करण्याच्या अनुषंगाने आणि भागधारकांचे आभार मानण्याकरिता संचालक मंडळाने एकास एक प्रमाणात बोनस समभागांची शिफारस केली आहे तसेच प्रती इक्विटी समभाग एक रुपयाचा लाभांश (बोनस-पूर्व प्रस्ताव) किंवा आर्थिक वर्ष २०२२ करिता प्रती समभाग ०.५० रुपये (पूर्व-बोनस प्रस्ताव) ची शिफारस करण्यात आली आहे.