Join us  

...तर सहाराच्या पुण्यातील अ‍ॅम्बे व्हॅलीचा लिलाव

By admin | Published: April 07, 2017 12:14 AM

सहारा समूहाने १७ एप्रिलपर्यंत ५०९२ कोटी रुपये भरावेत अन्यथा पुण्यातील सहाराच्या अ‍ॅम्बे व्हॅलीचा लिलाव करण्यात येईल

नवी दिल्ली : सहारा समूहाने १७ एप्रिलपर्यंत ५०९२ कोटी रुपये भरावेत अन्यथा पुण्यातील सहाराच्या अ‍ॅम्बे व्हॅलीचा लिलाव करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले आहे. सहाराच्या अ‍ॅम्बे व्हॅलीचे मूल्य ३९ हजार कोटी रुपये आहे. न्या. दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने सहारा समूहाला स्पष्ट केले की, ही रक्कम भरण्यासाठी वेळेची मर्यादा वाढवून दिली जाणार नाही. कारण, सहारा समूहाने न्यायालयाला असा विश्वास दिला होता की, ही रक्कम १७ एप्रिलपर्यंत भरण्यात येईल. सहाराच्या वकीलांनी याबाबत अंतरिम अपिलाचा उल्लेख केला. यात ही रक्कम जमा करण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने स्पष्ट केले की, सहारा समूहाला ही रक्कम जमा करणे अनिवार्य आहे. यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, जर या प्रकरणात काही रक्कम जमा करण्यात येत असेल तर न्यायालय वेळ वाढवून देण्याबाबत विचार करु शकते. दरम्यान, सहारा समूहाच्या गुंतवणुकदारांचे पैसे परत देण्यासाठी सहाराची संपत्ती जप्त करण्याचे निर्देश यापूर्वीच न्यायालयाने दिले आहेत. सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या आईच्या निधनानंतर ६ मे २०१६ रोजी न्यायालयाने रॉय यांना चार आठवड्यांसाठी पॅरोल मंजूर केला होता. त्यानंतर पॅरोलची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. ४ मार्च २०१४ रोजी रॉय यांना तिहार तुरुंगात पाठविण्यात आले होते. >5092 कोटी रुपये १७ एप्रिलपर्यंत जमा करण्याचे निर्देश